सखापाटील जुन्नरकर
नवी मुंबई : महाशिवरात्रीनिमित्त पामबीच मार्गावरील सारसोळेच्या खाडीअंर्तगत भागात सोमवार, दि. ४ मार्च रोजी सारसोळेच्या ग्रामस्थांकडून बामणदेव भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुलवामा घटनेचे गांभीर्य लक्षात घेता यावर्षी सारसोळेच्या ग्रामस्थांकडून मनोरंजनपर नृत्याचे कार्यक्रम रद्द केले असून पूर्ण वेळ भजनाचे कार्यक्रम ठेवले आहेत.
पामबीच मार्गालगत असलेल्या सारसोळेच्या खाडीमध्ये सारसोळे ग्रामस्थांचे बामनदेवाचे मंदिर आहे. बामणदेव हा शंकराचाच अवतार असल्याने गेल्या अनेक वर्षापासून सारसोळेचे ग्रामस्थ गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाच्या माध्यमातून महाशिवरात्रीच्या दिनी बामणदेवाच्या भंडाऱ्याचे आयोजन करत असतात. बामणदेवाच्या भंडाऱ्यात सहभागी होण्यासाठी व बामणदेवाचे दर्शन घेण्यासाठी नवी मुंबई, ठाणे, पनवेल व रायगड भागातून दहा हजाराहून अधिक भाविक या ठिकाणी येत असतात. भंडाऱ्यापूर्वी सारसोळेचे ग्रामस्थ कांदळवन विभाग, नवी मुंबई महापालिका प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून या मार्गावर सफाई अभियान राबवून पामबीच मार्ग ते बामणदेव मंदिर या पर्यतच्या परिसराची सफाई करत असतात.
बामणदेव हा जागृत देव असून खाडीमध्ये मासेमारी करण्यासाठी गेल्यावर बामणदेवच आपले रक्षण करतो अशी सारसोळेच्या ग्रामस्थांची श्रध्दा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी बामणदेव भंडाऱ्यात सहभागी होण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष व महापालिका ब प्रभाग समितीचे सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी केले आहे.