देशामध्ये एकेकाळी चंबळचे खोरे म्हणजे गुन्हेगारांचे माहेरघर म्हणून संबोधले जायचे, पण आता चंबळच्या खोऱ्याचा तो इतिहास झाला आहे. चंबळच्या खोऱ्याकडे आज पाहिल्यावर कधी काळी या ठिकाणी गुन्हेगारांचा वावर होता यावर विश्वासही वाटणार नाही. ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबईच्या वेशीवर ठाण्याहून अथवा मुलुंडहून येताना लागणारे वेशीलगतचा नोड म्हणजेच ऐरोलीचा परिसर. ऐरोली म्हणजे गुन्हेगारांचे माहेरघर. ही ऐरोलीची आजची ओळख नाही तर मागील अडीच तीन दशकापासूनची ओळख आहे. पण मधल्या काळात ऐरोली शांत होती, परंतु ही शांतता नव्हती, तर वरवरचे ढोंग होते. गुन्हेगार कधी सुधरतच नाही, त्यांने कितीही सुधारण्याचा आव आणला तरी त्याच्यातील गुन्हेगारीरूपी सैतान जागा होतोच, वाल्याचा वाल्मिकी झाल्याचा इतिहास आहे, पण हे कलियुग आहे. वाल्मिकी बनण्याचा वाल्याने कितीही प्रयत्न केला तरी त्यातला वाल्या हा जागा होतोच, हे ऐरोलीत वारंवार विविध घटनांतून पहावयास मिळत आहे. अर्थात यास काही अंशी ऐरोलीकरही तितकेच जबाबदार आहेत. महापालिका स्थापनेपासून ऐरोली नोडमधून महापालिका सभागृहात आलेल्या नगरसेवकांची चौकशी करून पाहा. हाताच्या बोटावर मोजण्याइतपत चांगल्या नगरसेवकांचा अपवाद वगळल्यास ऐरोलीकरांनी गुंडांना व गुन्हेगारी प्रवृत्ती ठासून भरलेल्या घटकांनाच महापालिका सभागृहात आपले लोकप्रतिनिधी म्हणून पाठविल्याचे पहावयास मिळेल. ऐरोलीकरांनो, खरोखरीच गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांना मतदान करून त्यांना महापालिका प्रशासनात पाठविणे तुम्हाला भूषणावह वाटते का? अन्य भागातील नगरसेवकांकडे पाहिल्यावर आपली कोठेतरी चुक झाली आहे, याची ऐरोलीवासियांनो तुम्हाला खंत वाटत नाही का, पश्चाताप होत नाही का? ऐरोली नोडमधून गुन्हेगारी प्रवृत्तीचे नगरसेवक पाहिल्यावर उर्वरित नवी मुंबईकरांकडून एकच टाहो फोडला जातो, तो म्हणजे ऐरोलीकरांनो, अजून किती काळ गुन्हेगारांना नगरसेवक म्हणून पालिका सभागृहात पाठविणार आहात?
चोऱ्या, दरोडे, हाणामारी, खून, नगरसेवकांच्या हत्या आदी घटनांनी ऐरोलीच्या भूमीला अगोदरच काळीमा फासला आहे. त्यातच आता दोनच दिवसापूर्वी महापालिकेच्या एका वास्तूच्या लोकार्पण कार्यक्रमात संदीप नाईकांसारख्या युवा, उच्चशिक्षित, सुसंस्कृत आमदारांवर प्राणघातक हल्ला चढविला जातो, त्या आमदाराला लोकांसमक्ष शिवराळ भाषा वापरली जाते. हे कोणी केले व करवून आणले, हे आता ऐरोलीवासियांनी, नवी मुंबईकरांनीच नाही तर उभ्या महाराष्ट्राने जवळून पाहिले आहे. आमदाराला दगाफटका करण्याचे हे निश्चितच एक षडयंत्र होते. पालिकेच्या लोकार्पण कार्यक्रमात गाडीवर हल्ला चढविताना कोणाकोणाकडे काय होते आणि ती घटना घडत असताना आमदाराच्या गाडीजवळ कोणाचा वावर होता, हे सोशल मिडीयाच्या माध्यमातून नवी मुंबई कार्यक्षेत्रातील घराघरातील रहीवाशांना समजले आहे.
नगरसेवक हा सुशिक्षित असावा, लोकांची सेवा करणारा असावा,. आता सरसकटपणे सर्वच नगरसेवक मिठाई खातात, ही जगजाहिर बाब आहे. धुतल्या तांदळासारखे कोणीही स्वच्छ राहीलेले नाही. विकासकामांच्या बाबतीत स्थायी समिती सदस्यांना काजू कतरी भेटते, प्रभागामध्ये विकासकामे करताना ठेकेदाराकडून त्या त्या विभागातील नगरसेवकालाही न सांगता मिठाई मिळते. कारण पालिका प्रशासनाकडून मिळणाऱ्या अवघ्या दहा हजाराच्या मानधनात कोणाही नगरसेवकाचे घर चालणार नाही, ही बाब जगजाहिर आहे. त्यात विवीध सणांना, क्रिकेट स्पर्धाना, सोसायटीच्या कामांना व अन्य सांस्कृतिक कामांना नगरसेवकांना फोडणी बसतच असते. ही फोडणी मिठाई व काजू कतरीमधून दिली जात असते. निवडणूकीत अवघ्या दहा हजाराच्या मानधनासाठी प्रचारादरम्यान लाखो-करोडो रूपयांची उधळण होत असते. कारण निवडून आल्यावर जमा झालेल्या मिठाईतून आपली नुकसान भरपाई होणार याची त्या त्या भागातील राजकीय घटकांनाही कल्पना असते. ऐरोलीकरांनो, एकवेळ विकासकामे करताना मिठाई खाणारा नगरसेवक आम्हाला नवी मुंबई महापालिका सभागृहात चालेल. कारण पालिका स्थापनेपासून मिठाई प्रक्रिया सुरू असून सर्वपक्षीय नगरसेवक या मिठाईचा गोडवा चाखत असतात. कारण मिठाई खाण्यासाठी नगरसेवक आपल्या प्रभागात अधिकाधिक विकासकामे करून घेईल आणि त्यातून नकळत का होईना जनतेचेही भले होईल. पण गुन्हेगारी प्रवृत्तीचे नगरसेवक आता नको. ऐरोलीकरांनो हे आता कोठेतरी थांबवा. तुमच्याच मतातून निर्माण झालेल्या या भस्मासुराला मतपेटीतून लाथाडून संपवा. तुम्ही निर्माण केलेले राजकारणातील पाप आता तुम्हालाच संपवावे लागणार आहे. अन्य भागाच्या तुलनेत ऐरोली नोडमधूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक मोठ्या प्रमाणावर महापालिका सभागृहात का येतात याचेही ऐरोलीवासियांनो आता तुम्हाला आत्मपरिक्षण करावेच लागेल. म्हतारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावता कामा नये. राजकारणातील गुन्हेगारांना कालही राजकारण्याचे संरक्षण होते व आजही मिळत आहे. कुऱ्हाडीचा दांडा हा गोतास काळ असतो, याची प्रचिती आता सर्वाना आली असणारच. त्यामुळे ऐरोली नोडची प्रतिमा बदलण्याचे शिवधनुष्य आता ऐरोलीवासियांनाच उचलावे लागणार आहे. तुम्ही निर्माण केलेली घाण मिटविण्यासाठी मतपेटीतूनच लोकशाही माध्यमातून तुम्हाला साफ करावी लागणार आहे. केवळ महापालिका निवडणूकीतच नाही तर जवळ आलेल्या लोकसभा निवडणूकीपासून व त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणूकीतही ऐरोलीच्या मतदारांना काळजी घ्यावी लागणार आहे. कारण महापालिकेत गुन्हेगारी प्रवृत्ती ऐरोली नोडमधून फोफावली असली तरी ही गुन्हेगारी कोण पोसते, याचे राजकीय गॉडफादर कोण आहेत याचाही ऐरोलीवासियांनी तळाशी जावून शोध घेणे आवश्यक आहे. ऐरोलीवासियांनो आता तरी आत्मपरिक्षण करा. चुकीचे संस्कार झाल्यानेच अथवा चुकीच्या संगतीत वाममार्गाला लागल्याने गुन्हेगारी फोफावते. अर्थात लोकशाहीत निर्माण झालेली ही ‘व्हाईट कॉलर’ गुन्हेगारी आपणास मतपेटीतूनच संपवावी लागणार आहे. आपल्या परिसराला लागलेला कंलक पुसण्यासाठी आता ऐरोलीवासियांनाच संघठीत व्हावे लागणार आहे.
- सखापाटील जुन्नरकर