नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या ‘वंडर्स पार्क’ येथे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या समस्यांकडे व असुविधांकडे पालिका प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यामुळे ठेकेदाराकडून कामगारांचे शोषण होत आहे. त्यांना कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. कामगारांच्या समस्या न सुटल्यास आणि ठेकेदारावर कारवाई न झाल्यास समस्येचे निवारण होईपर्यत ‘वंडर्स पार्क’मध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी आणि राज्याचे कामगार मंत्री संभाजीराव निलंगेकरपाटील यांना दिला आहे.
महापालिकेच्या ‘वंडर्स पार्क’ येथील कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कामगारांवर ठेकेदाराच्या पर्यायाने महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून होत असलेल्या अन्यायाकडे व त्यांना त्रासदायक ठरणाऱ्या असुविधांकडे रवींद्र सावंत यांनी निवेदनातून महापालिका आयुक्तांचे व राज्याच्या कामगार मंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. या ‘वंडर्स पार्क’मध्ये जवळपास १२५च्या आसपास कंत्राटी कामगार काम करत आहेत. ‘वंडर्स पार्क’मुळे नवी मुंबई शहराच्या सौंदर्यात भर पडली असली तरी तेथील कंत्राटी कामगारांचे होत असलेल्या शोषणामुळे ‘वंडर्स पार्क’च वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. येथे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचा पीएफ कापला जात नाही. त्यांना कोणत्याही वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत नाही. पालिका प्रशासन व ठेकेदारांकडून कोणत्याही सुविधा कामगारांना उपलब्ध होत नसून ठेकेदाराकडून कामगारांचे आर्थिक शोषण केले जात आहे . पालिका प्रशासन ‘वंडर्स पार्क’चा ठेका सांभाळणाऱ्या ठेकेदाराला देत असलेल्या निधीमध्ये कामगारांचा पीएफ कापला जाणे आवश्यक असतानाही ठेकेदार कामगारांचा पीएफ कापत नसल्याचे रवींद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
कामगार संघटनेच्या माध्यमातून रवींद्र सावंत यांनी येथील कामगारांच्या समस्या वारंवार निदर्शनास आणून देवूनही मनपाने या समस्या निवारणासाठी कोणताही सकारात्मक प्रतिसाद आजवर दिलेला नाही. एकप्रकारे शोषित व पिडीत कामगारांना न्याय देण्याऐवजी महापालिका प्रशासन ठेकेदाराचीच पाठराखण करत असल्याचा आरोपही सावंत यांनी निवेदनात केला आहे. कामगारांना ठेकेदाराकडून कुशल, अर्धकुशल या निकषावरही वेतन देत नाही. कामगारांना वेतन स्लीप नाही, ओळखपत्र नाही, यासह असंख्य समस्या असून ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरू आहे. ठेकेदार कामगारांना आरोग्य सुविधा देत नाही, पीएफ कापत नाही, ओळखपत्र नाही, वेतन स्लीप नाही हा ठेकेदाराचा तुघलकी कारभार पाहता महापालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला ‘वंडर्स पार्क’ आंदण दिले आहे काय, याविषयी पालिका प्रशासनाकडून खुलासा करण्याची मागणी सावंत यांनी निवेदनातून केली आहे.
कामगारांच्या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास नवी मुंबई इंटकच्या वतीने ‘वंडर्स पार्क’मध्येच समस्या निवारण होईपर्यत ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. संतप्त कामगारांचा उद्रेक होवून काही दुर्घटना घडल्यास त्यास सर्वस्वी संबंधित ठेकेदार व महापालिका प्रशासनच जबाबदार राहील असा इशारा सावंत यांनी दिला आहे.