भाजपा प्रदेश कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
मुंबई : नागरिकांशी मित्रत्वाच्या नात्याने वागणारा आधुनिक गोव्याचा निर्माता गमावला, अशा शब्दात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी सोमवारी गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
भाजपा, महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात सोमवारी मनोहर पर्रिकर यांना पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यावेळी माधव भांडारी बोलत होते. यावेळी आमदार अनिल बोंडे, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, कार्यालय सहसचिव शरद चव्हाण आणि भरत राऊत तसेच सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टचे सदस्य गोपाळ दळवी उपस्थित होते.
माधव भांडारी म्हणाले की, मुख्यमंत्री पदावर असून ही मनोहर पर्रिकर यांचे गोव्यातील नागरिकांसोबत मित्रत्वाचे नाते होते. पर्रिकर यांनी गोव्याचा चेहरा-मोहरा बदलला. आधुनिक गोव्याचे निर्माते अशी नवीन ओळख गोव्यातील नागरिकांना त्यांना दिली आहे. गोव्याच्या राजकारणाला स्थिरता देण्यात मनोहर पर्रिकर यांचा सिंहाचा वाटा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संरक्षण खात्यातील शस्त्र खरेदीतले दलालांची बजबजपूरी थांबविण्यात त्यांना यश आले.
आमदार अनिल बोंडे म्हणाले की, मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने आपण देशाचा सुपुत्र गमावला आहे. साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या विचारातुन प्रेरणा घेऊन समाजातील तळागळातील लोकांसाठी कार्य करावे.