अक्षय काळे
मुंबई : ‘हे वर्ष मोदीमुक्त भारताचे जावो’ असे वक्तव्य करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पाडवा मेळाव्यातील भाषणाची सुरुवात केली. ‘मोदी आणि शहामुक्त भारत व्हावा म्हणून लोकसभा निवडणूक लढवत नसतानाही मी महाराष्ट्रभर सभा घेणार आहे. त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला तर झाला’ असे नमूद करतानाच येत्या काही दिवसांत महाराष्ट्रभर ८ ते १० सभा घेणार अशी घोषणाही राज यांनी केली.
मनसेच्या पाडवा मेळाव्याला शिवाजी पार्कात प्रचंड गर्दी झाली. या सभेत नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच राज यांच्या भाषणाचे ‘लक्ष्य’ दिसत आहे.
पंतप्रधान मोदींनी पाच वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही. तुमच्या आमच्या कोणत्याही प्रश्नांना ते उत्तर द्यायला तयार नाहीत. पत्रकारांपुढे यायला त्यांना कसली भीती वाटतेय, असा थेट सवाल राज यांनी केला.
पाकिस्तानचं विमान पाडल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत असले तरी अमेरिकेने पाकला दिलेले कोणतेही लढाऊ विमान पाडले गेलेले नाही, अशा बातम्या आज प्रसिद्ध झाल्या असून यावर पंतप्रधान मोदी यांनी देशाला उत्तर द्यायला हवं. मोदी खोटं का बोलले हे आम्हाला कळायला हवं, असे राज ठाकरे म्हणाले.
मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मोदी आणि भाजपा सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. नोटाबंदीमुळे ४ कोटी नोकऱ्या गेल्या, शेकडो लोकांचा रांगेत मृत्यू झाला, पण माध्यमांवर दबाव टाकून त्यांना ह्या सगळ्या बातम्या दडपायला लावल्या. त्यामुळे प्रसारमाध्यम आणि लोकांपर्यंत बातम्या पोहोचत नव्हत्या. संपादकांचे, चॅनेलचे स्वातंत्र्य काढून घेतले. हे कोणाचे सरकार आहे. ही भीषण परिस्थिती सध्या आहे, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत. नोटाबंदीनंतर देशात ४ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, ९९.३%पैसे बँकेत परत आले. म्हणजे नोटबंदी ही अपयशी ठरली. त्यावेळी मोदी म्हणाले होते की, जर ५० दिवसांत सगळे सुरळीत नाही झाले तर मला कोणत्याही चौकात उभे करा आणि मला हवी त्या शिक्षा द्या. मोदी तुम्ही चौक ठरवा आता, शिक्षा द्यायला आम्ही येतो, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.
मला कोणाच्या खासगी आयुष्यात जायचे नाही, पण नरेंद्र मोदी वर्षातून एकदा आईला भेटायला जातात, त्यावेळी मीडियाला घेऊन का जायचे? नोटाबंदीच्या वेळेला स्वतःच्या आईला रांगेत उभे केले. भावनिक राजकारण करायचे म्हणून कुठल्या थरापर्यंत जाणार तुम्ही? ह्यातून मोदींचा दृष्टिकोन कळतो, अशी घणाघाती टीका राज ठाकरेंनी केली आहे. काँग्रेसच्या जुन्या योजनांची नावे बदलून त्यांनी भाजपाच्या स्वतःच्या योजना म्हणून त्या घोषित केल्या. काँग्रेसला नेहरू गांधींच्या पलीकडे नावं देता येत नाहीत, भाजपला पंतप्रधान किंवा भाजपा हीच का नावे सुचतात. आपल्या देशात इतकी कर्तृत्ववान माणसे जन्माला आली, पण त्यांची नावे प्रकल्पांना का देत नाही, असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
नमामि गंगेसाठी २० हजार कोटी खर्च करू म्हणाले, गंगा साफ झाली नाही पण पैसे कुठे गेले हे कळले नाही. जी. डी. अग्रवाल गंगा स्वच्छ व्हावी म्हणून उपोषणाला बसले होते, पण त्यांना एकदाही भेटायला पंतप्रधान गेले नाहीत. शेवटी १११ दिवस उपोषण करून ते वारले. गंगा स्वच्छतेसाठी नेमलेल्या कमिटीच्या बैठकीला आजपर्यंत मोदी एकदाही उपस्थित राहिलेले नाहीत, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला आहे. त्यावेळी त्यांनी पंतप्रधानांच्या बोलघेवड्यापणावर टीका केली आहे. आमच्या पंतप्रधानांची जगभरात फेकू अशीच ओळख आहे, इंटरनेटवर फेकू शब्द टाईप केला तर मोदींचे नाव येते. ही माझ्या पंतप्रधानांची इमेज जगभरात आहे, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत. इंदिरा गांधींनंतर ३० वर्षांनी एका पक्षाला या देशात बहुमत मिळालं. भारताचं पंतप्रधान होण्यासाठी अनेकांची हयात गेली.
लालकृष्ण अडवाणींनी सत्तेपर्यंत पक्ष आणला, त्यांनाही पंतप्रधान व्हायचे होते, पण नाही होऊ शकले. मी रतन टाटांच्या सांगण्यावरून त्यावेळी गुजरातला गेलो, तिथे मला जे जे दाखवले त्यावरून मी माझे मत बनवले, पण नंतर माझ्या लक्षात आले की मला तेवढेच दाखवले गेले जेवढे दाखवयाच्या लायकीचे होते.
गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरेंनी शनिवारी शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेतली आहे. यावेळी त्यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आज देशावर नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन माणसांचे संकट आलेले आहे, ते दूर करण्यासाठी राज ठाकरे प्रयत्न करत राहणार आहे. इथे तेलुगू देसम किंवा इतर पक्ष नसून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच हे पक्ष आहेत. माझ्या प्रचाराचा फायदा त्यांना होत असेल, तर मी काय करू, असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. भाजपा आणि त्यांचे सहकारी पक्ष निवडून येऊ नयेत, म्हणून मी बोलणार आहे.
इंदिरा गांधींनी पाकिस्तानची फाळणी करून बांगलादेशची निर्मिती केल्यानंतरही आरएसएसने त्यांना पाठिंबा दिला होता, आरएसएसने काँग्रेसला पाठिंबा दिला होता. भाजपाच्या लोकांना एकदा विचारा, ७५ला आणीबाणी आणली गेली, ७७ निवडणुका झाल्या, त्यावेळी निवडणुकीत उभा असलेल्या जनता पक्षाला मतदान करणारे असंख्य काँग्रेसवाले होते. राजीव गांधींची, इंदिरा गांधींची हत्या झाली, त्यावेळी अनेकांनी काँग्रेसला मतदान केले. देश संकटात आल्यास वेगळा विचार करणे गरजेचे असते, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.