ऐरोली आणि रबाळेत प्रचाराचा झंझावात
नवी मुंबई : कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि संयुुक्त पुरोगामी महाआघाडीचे ठाणे लोकसभा मतदार संघातील उमेदवार आनंद परांजपे यांच्या नवी मुंबईतील निवडणूक प्रचाराला प्रचंड प्रतिसाद लाभतो आहे. शुक्रवारी ऐरोली, रबाळे आणि गुरुवारी नेरुळ येथे काढण्यात आलेल्या प्रचार फेर्यांना नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
यंदाची निवडणुक केंद्रात बदल घडविणारी असून परांजपेंचा विजय निश्चित असल्याचे आमदार संदीप नाईक यांनी सांगितले. परांजपेंचा विजय हा लोकनेते गणेश नाईक यांच्या विचारांचा विजय असून नाईक साहेबच उमेदवार आहेत असे समजून कार्यकर्त्यांनी परांजपेंच्या विजयासाठी झटून काम करावे, असे आवाहन आमदार नाईक यांनी केले.
ऐरोलीतील चिंचपाडा, यादवनगर आणि रबाळेतील प्रभाग क्रमांक १९ व २० त्याचबरोबर नेरुळच्या अनेक भागात परांजपेंची प्रचारयात्रा काढण्यात आली. रबाळेतील रॅलील उमेदवार आनंद परांजपे व आमदार संदीप नाईक यांच्या समवेत माजी महापौर व विद्यमान ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर सोनावणे, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, राष्ट्रवादी व्हीजेएनटी सेलचे ठाणे शहर अध्यक्ष सुंदरलाल जाधव, राष्ट्रवादीच्या नगरसेविका रंजनाताई सोनावणे, माजी नगरसेविका डॉ.गौतमी साबळे, कॉंग्रेसचे माजी नगरसेवक अंकुश सोनावणे, संजय देढे, प्रभागातील नागरिक, अनेक सामाजिक कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते. ऐरोलीत माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, राष्ट्रवादीच्या स्थानिक नगरसेविका संध्या यादव, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, राष्ट्रवादीचे यल्लू शिंगे आदी मान्यवर उपस्थित होते. नेरुळच्या रॅलीत महापौर जयवंत सुतार, पालिकेतील सभागृहनेते रविंद्र इथापे, कॉंग्रेेसचे प्रदेश चिटणीस संतोष शेटटी, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार, माजी नगरसेवक सुरेश शेटटी, युवक कॉंग्रेसचे निशांत भगत, नगरसेविका शिल्पा कांबळी, नगरसेविका मिरा पाटील, प्रभाग समिती सदस्य बिपीन जवेरी, विजय साळे, राष्ट्रवादीच्या अल्प संख्याक सेलचे सुलतान मालदार आदींसह आघाडीचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.
रबाळेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयाच्या प्रवेशद्वारानजीक चौकातून फटाके, ढोल ताशांच्या गजर करीत रॅलीला सुरुवात झाली. प्रभागातील मुस्लिम समाजाच्या मुलांनी व नागरिकांनी परांजपे आणि आ.नाईक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
भारताच्या संविधानाचे तुकडे करणार्या आणि सर्व सामान्य जनतेला खोटी आश्वासने देत सत्तेवर आलेल्या केंद्रातील मोदी सरकारला घरी बसवा. लोकनेते गणेश नाईक यांनी परांजपे यांच्या रुपाने एक अभ्यासू, जिज्ञासू उमेदवार दिला असून रबाळेच्या भविष्यातील विकासासाठी लोकनेते नाईक यांच्या स्वप्नांच्या पुर्ततेसाठी परांजपेंना विजयी करावे.
– सुधाकर सोनावणे, माजी महापौर