माथाडी नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेते व माथाडी नेते शशिकांत शिंदे यांच्यातील वादामुळे यंदाच्या लोकसभा निवडणूकीत मतदान कोणाला करायचे याबाबत माथाडी कामगार संभ्रमात पडले आहे. शिंदे-पाटील यांच्यातील राजकीय वादामुळे राज्यातील सर्वात मोठी माथाडी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माथाडी संघटनेमध्ये लोकसभा निवडणूकीनंतर फूट पडणार असल्याची भीती माथाडी कामगारांकडून व्यक्त केली जात आहे.
आजवर झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत माथाडी कामगारांपुढे मतदान कोणाला करायचे, हा प्रश्न कधी निर्माण झालाच नाही. कारण निवडणूका कधीही झाल्या तरी मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पनवेल आदी भागात विखुरलेला माथाडी कामगार हा हमखासपणे राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच मतदान करणार, ही काळ्या दगडावरची रेघ मानली जात होती. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा व कोल्हापुर जिल्ह्यातील मतदानावर प्रभाव निर्माण करणारा माथाडी कामगार आपली व आपल्या परिवाराच्या पोटाची खळगी भरण्यासाठी शहरात आलेला आहे. नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, पनवेल तालुकास्तरीय बाजार समिती, कळंबोली स्टील मार्केट, शहरी भागातील एमआयडीसी, मस्जिद, भायखळा, दादर, शिवडी, भिवंडी या ठिकाणी माथाडी कामगारांचे रोजगाराच्या क्षेत्रात प्राबल्य आहे. ग्रामीण भागात मतदान करून पुन्हा शहरी भागात येवून मतदान करायचा ही आजवरच्या निवडणूकांमध्ये माथाडी कामगारांची वहीवाटच बनलेली आहे. यंदाही मुंबईतील व पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकांच्या तारखा वेगवेगळ्या असल्याने माथाडी कामगार दोन्ही ठिकाणी मतदान करण्याची शक्यता आहे. सातारा, कोल्हापुर वगळता पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील निवडणूकांवर माथाडी कामगारांचा प्रभाव आहे. २००९ साली झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये शहरी व ग्रामीण भागातील निवडणूका एकाच दिवशी आल्याने शहरी भागातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांना माथाडींच्या मतदानासाठीच्या ग्रामीण प्रेमाची फार मोठी किमंत मोजावी लागली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधानसभा निवडणूकीतील उमेदवारांनी मिनतवाऱ्या करून, तसेच पुणे-मुंबई महामार्ग सुरू होतो, त्या कळंबोली या ठिकाणी पहारा देवूनही माथाडी कामगार मतदानासाठी गावाकडे गेले होते.
मराठा समाजाचे मातब्बर नेते व माथाडी कायद्याचे शिल्पकार असणाऱ्या अण्णासाहेब पाटील यांच्या निधनानंतर माथाडी कामगारांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा विशेष प्रभाव राहीलेला आहे. नवी मुंबईतील नेरूळ, कोपरखैराणे, ऐरोली, घणसोली कॉलनी आदी भागात शरद पवारांच्या कार्यप्रणालीमुळे माथाडी कामगारांना तसेच बाजार आवारातील संबंधित घटकांना निवासी क्षेत्रात जागा व अन्य सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. आज कोपरखैराणे परिसरात असलेल्या माथाडी वसाहतीमधील घरे २५ लाखापासून ६० लाखापर्यत महागली आहे. परंतु या घरांचे ओटे अवघ्या २० हजार रूपयांमध्ये माथाडी कामगारांना सिडकोने शरद पवारांच्या प्रभावामुळे तत्कालीन परिस्थितीत उपलब्ध करून दिले आहेत. घणसोली कॉलनीतील सिम्पलेक्स, घरौंदामध्ये माथाडीच्या निवासी प्रभावाला शरद पवारांचे माथाडी कामगारांवरील प्रेमच कारणीभूत आहे.
माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधान परिषदेवर आमदार म्हणून काम करण्याची सहा वर्षे संधी दिली होती. तथापि नरेंद्र पाटलांची अलिकडच्या काळात राजकीय महत्वाकांक्षा वाढीस लागल्याने व भाजपशी विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी त्यांची वाढती जवळीक पाहता नरेंद्र पाटील कोणत्याही क्षणी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडणार अशी चर्चा गेल्या काही महिन्यापासून माथाडी कामगारांसह बाजार आवारातील अन्य घटकांमध्ये सुरू होती. भाजपने त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद देवून आपलेसे केले. नरेंद्र पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला, परंतु त्यांचा हा प्रवेश काही क्षणापुरताच ठरला. सातारा लोकसभा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला जाताच त्यांनी भाजपला रामराम करत शिवसेनेच्या शिवबंधनात स्वत:ला विलिन करून घेतले. नरेंद्र पाटील आज सातारा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवित आहेत.
एकीकडे नरेंद्र पाटील यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस-भाजप-शिवसेना असा बदलता राजकीय प्रवास असताना दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मातब्बर नेते शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसशी एकनिष्ठ राहण्याला प्राधान्य दिले आहे. नरेंद्र पाटील स्वत: मराठा महासंघाचे अध्यक्ष असताना त्यांनी छत्रपतींच्या वारसाविरोधात निवडणूक लढवावी, ही गोष्टही माथाडी कामगारांना पसंत पडलेली नाही. नरेंद्र पाटील आणि शशिकांत शिंदे वादामुळे माथाडी कामगारही शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये विभागला जाण्याची शक्यता आहे. शरद पवारांवर प्रेम दाखवित नेहमीप्रमाणे राष्ट्रवादी कॉग्रेसला मतदान करायचे की अण्णासाहेब पाटील यांच्या उपकारामुळे नरेंद्र पाटलांची सोबत करायची अशा कात्रीत माथाडी कामगार अडकला आहे. लोकसभा निवडणूकीनंतर होणाऱ्या मतमोजणीनंतरच सातारा, कोल्हापुर व पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील मतदानावरून माथाडी कामगारांचा कल नेमका कोणाकडे आहे, ते स्पष्ट होणार आहे.