नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या १५० ऐरोली व १५१ बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का २९ एप्रिल २०१९ रोजी होणाऱ्या ठाणे लोकसभा निवडणुकीत वाढावा याकरिता दोन्ही ठिकाणच्या सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत असून याकामी नवी मुंबई महानगरपालिकेचेही संपूर्ण सहकार्य लाभत आहे.
या अनुषंगाने ‘२९ एप्रिलला मी मतदान करणारच. तुम्हीही मतदान करा व इतरांनाही आपला मतदानाचा हक्क बजावायला सांगा’ असा संदेश लिहिलेला फोटो पॉईंट महापालिका मुख्यालय इमारतीत तयार करण्यात आला असून त्या बाजूला ‘मी मतदान करणारच’ असा स्वाक्षरी फलक असून त्यावर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी या फलकावर स्वाक्षरी करीत तसेच फोटो पॉईंटवर फोटो काढत या उपक्रमाचा शुभारंभ केला. याप्रसंगी त्यांच्यासमवेत मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, निवडणूक विभागाचे सहा. आयुक्त श्री. बाळकृष्ण पाटील व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
वास्तुरचनेच्या दृष्टीने आयकॉनिक इमारत म्हणून नावाजल्या जाणा-या महापालिका मुख्यालय वास्तुस दररोज विविध कामानिमित्त नागरिक मोठ्या संख्येने भेटी देत असतात. त्यांच्या मनात मतदानाचे महत्व रूजण्यासाठी सध्याच्या सेल्फीप्रेमी सोशल मिडियाच्या युगात नागरिकांनी आपले छायाचित्र फोटो पॉईंटवर काढून व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर प्रसारित करावे व यातून मतदानाविषयी जनजागृती करावी यादृष्टीने मुख्यालयात तळमजल्यावरील मोठ्या पॅसेजमध्ये फोटो पॉईंट व स्वाक्षरी फलक ठेवण्यात आला आहे. अशाच प्रकारची व्यवस्था स्टेशन तसेच वर्दळीच्या ठिकाणी करण्यात आलेली आहे.