नवी मुंबई : महाराष्ट्र राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचा जोरदार प्रचार सुरू असून ठाणे जिल्हाही त्याला अपवाद नाही. आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्याही प्रचारात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खांद्याला खांदा लावून करत असताना नेरूळ सेक्टर दोन परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेसला कॉंग्रेसच्या उद्रेकाची भेट मिळाली आहे. आघाडी आहे तर विश्वासात घेवून काम करा, अन्यथा कायमचाच टाटा करू असा जाहीरपणे जनतेसमोर इशारा देताना कॉंग्रेसचे नेरूळ तालुका ब्लॉक अध्यक्ष व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेतेमंडळी कॉंग्रेसला गृहीत धरत नसल्याचा संताप उद्रेक केला. रॅलीदरम्यान उपस्थित जनसमुदायासमोर ‘सागर नाईक तुम्ही आम्हाला टाटा करून जात असाल तर आम्हालाही तुम्हाला कायमचाच टाटा करावा लागेल, याचमुळे तुम्ही मागे आहात’ असे खडे बोल कॉंग्रेसचे स्थानिक नेते रवींद्र सावंत यांनी नवी मुंबईचे माजी महापौर व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते सागर नाईक यांना सुनावले.
नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, सभागृह नेते रवींद्र इथापे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेश पदाधिकारी संतोष शेट्टी यांच्यासह कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीदरम्यान कॉंग्रेसच्या कार्यालयासमोरून रॅली जात असताना रॅलीमधून सागर नाईक हे जमा असलेल्या कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना टाटा करून रॅली पुढे घेवून जात असल्याचे पाहताच कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा राग अनावर झाला आणि त्यातून मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायासमोर कॉंग्रेसचा उद्रेक आघाडीच्या स्थानिक मातब्बरांना पहावयास मिळाला.
निवडणुका जाहिर झाल्यापासून नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष व कॉंग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष रवींद्र सावंत हे त्यांच्या कार्यक्षेत्रात आघाडीच्या आनंद पराजंपेचा जोरदारपणे प्रचार करत आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या लोकांसारखे फोटोसेशन न करता प्रसिध्दीपासून लांब राहत रवींद्र सावंत यांच्याजोडीला कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते काम करत आहेत. निवडणूकांच्या अगोदर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व मातब्बरांची बैठक झाली असता लोकनेते गणेश नाईकांसमोर रवींद्र सावंत यांनी कॉंग्रेसची बाजू सक्षमपणे मांडली होती. आघाडी असतानाही कॉंग्रेसला प्रचार साहीत्य दिले जात नसल्याची तक्रारही रवींद्र सावंत यांनी आमदार संदीप नाईकांकडे केली होती. आघाडी असतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मित्र पक्ष असलेल्या कॉंग्रेसला डावलत असल्याचा संताप कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खदखदत होता. अखेरीला रवींद्र सावंतांच्या माध्यमातून तो राग उफाळून बाहेर पडला.
सोमवारी सांयकाळी नेरूळ पश्चिमला आघाडीचे उमेदवार आनंद पराजंपे यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नेरूळ सेक्टर ४ येथील वाधवा टॉवरपासून या रॅलीला सुरूवात होणार होती. आघाडीच्या उमेदवाराची रॅली म्हणून कॉंग्रेसच्या रवींद्र सावंतांच्या कार्यालयाजवळ मोठ्या प्रमाणावर कॉंग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी जमले होते. रॅली येण्याच्या अगोदरपासून आघाडीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणाबाजी सुरू होती. स्वत: रवींद्र सावंत माईक घेवून घोषणाबाजी करताना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचे काम करत होते. परंतु रॅली त्यांच्या कार्यालयाजवळ येताच न थांबता पुढे जावू लागली. माजी महापौर सागर नाईक हे कॉंग्रेस कार्यालयासमोर दोन तास उभ्या असलेल्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना टाटा करून पुढे जावू लागताच कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा व रवींद्र सावंत यांच्या संयमाचा बांध अखेर फुटला आणि माईकवरूनच त्यांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.
‘सागर नाईकसाहेब टाटा करून काय जाताय, आम्ही तुम्हाला कायमचाच टाटा करू, सागर नाईक टाटा कोणाला करताय, याचमुळे तुम्ही मागे आहात’ या शब्दातच रवींद्र सावंत यांनी बराच वेळ आपला उद्रेक व्यक्त केला. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनीही राहूल गांधी आगे बढो याच घोषणांवर भर दिला. कॉंग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित असल्याने कॉंग्रेसच्या बाजून घोषणा वाढत गेल्या. महिला कार्यकर्त्यांनीही आपला संताप यावेळी व्यक्त केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, महापौर जयवंत सुतार आणि कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी रॅली थांबवून सेक्टर दोन येथील कॉंग्रेस कार्यालयासमोर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
रॅलीच्या आयोजनामध्ये हा थांबा नसल्याने गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सांगण्यात आले. आम्ही गणेश नाईकांना मानतो, त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही आघाडी धर्म निभावत आहोत, लोकसभेला आम्हाला ही वागणूक मिळत असेल तर विधानसभेला आम्हीही पहिल्यापासूनच काय करायचे ते ठरवू असा संताप यावेळी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून व पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला. कॉंग्रेसच्या उद्रेकाची व रवींद्र सावंताच्या संतापाची महाराष्ट्रभरातील कॉंग्रेसकडून दखल घेतली जात आहे. या रॅलीदरम्यानच्या गोंधळाचा व्हिडिओ महाराष्ट्रात सर्वत्र आज सकाळपासून ‘व्हायरल’ होवू लागला आहे.