श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीकरिता नवी मुंबई महानगरपालिकेचा अधिकारी, कर्मचारीवृंद मोठ्या प्रमाणावर व्यस्त असतानाही महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे तसेच अनधिकृत फेरीवाले व मार्जिनल स्पेसवरील कारवायांकडे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचे काटेकोर लक्ष असून सर्वच विभागीय कार्यक्षेत्रात संबंधित विभाग अधिकारी यांचेमार्फत उपलब्ध कर्मचारीवृंदाकडून अनधिकृत फेरीवाले व मार्जिनल स्पेसवरील कारवाईचे काम करण्यात येत आहे.
अतिरिक्त आयुक्त शहर श्री. रविंद्र पाटील व अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. अमरिश पटनिगीरे यांच्या नियंत्रणाखाली सर्वच विभाग कार्यक्षेत्रात अनधिकृत फेरीवाले व मार्जिनल स्पेसवर धडक कारवाई करीत एप्रिल महिन्यात एकूण 6350 अनधिकृत फेरीवाले तसेच 106 मार्जीनल स्पेसेसवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे. त्यासोबत 1 लक्ष 92 हजार इतकी दंडात्मक रक्कमही वसूल करण्यात आलेली आहे.
यामध्ये वाशी विभागात 1901 अनधिकृत फेरीवाले व 51 मार्जीनल स्पेसवर धडक कारवाई करण्यात आली असून 1 लक्ष 11 हजार 500 इतक्या मोठ्या प्रमाणावर दंडात्मक रक्कमेची वसूली करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे तुर्भे विभागातही 1370 अनधिकृत फेरीवाले व 16 मार्जीनल स्पेसवर धडक कारवाई करण्यात आली असून 17 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. आहे. याशिवाय अनधिकृत फेरीवाले हटाव मोहिमेत बेलापूर-350, नेरूळ-363, कोपरखैरणे-500, घणसोली 499, ऐरोली – 915 व दिघा – 452 याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. मार्जिनल स्पेसवरील कारवायांमध्येही बेलापूर-4, कोपरखैरणे-14, घणसोली-6, ऐरोली-15 याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.
नवी मुंबई शहराची सुनियोजित प्रतिमा कायम राखण्यासाठी महानगरपालिका सदैव कटिबध्द असून महानगरपालिका क्षेत्रातील पदपथ व रस्ते नागरिकांना चालण्यासाठी व वाहतुकीसाठी खुले असावेत ही महानगरपालिकेची भूमिका आहे. त्यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखील लोकसभा निवडणूक आचारसंहिता काळात बहुतांश महापालिका कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असतानाही उपलब्ध कर्मचारीवृंदाकडून अनधिकृत फेरीवाले व मार्जीनल स्पेसवरील कारवाया तीव्रतेने राबविण्यात येत आहेत. नागरिकांनीही अशा अनधिकृत फेरीवाल्यांकडून साहित्य खरेदी न करता सहकार्य करावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.