नवी मुंबई : शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि खासदारांनी नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची चेष्टा चालविली असून हा अपमान सहन करणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हा युवक अध्यक्ष आणि नगरसेवक सुरज पाटील यांनी दिला आहे.
भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी अलीकडे प्रकल्पग्रस्त आणि त्यांच्या संघटनांना बोगस म्हटले होते तर आता खासदार राजन विचारे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटीच्या बांधकामांना झोपड्या असे संबोधित करून प्रकल्पग्रस्तांच्या भावनांचा अपमान केला आहे. नवी मुंबईच्या निर्मितीसाठी येथील स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या जमिनी सिडकोला कवडीमोल भावात दिल्या. सिडकोने मात्र वेळेत या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केले नाही त्यामुळे कुटुंब संख्या वाढल्याने प्रकल्पग्रस्तांनी राहण्यासाठी घरे आणि उदरनिर्वाहासाठी वाणिज्य बांधकामे केली. या बांधकामांची मालकी देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तांच्या संघटनांचा संघर्ष सुरू आहे. एकीकडे ही बांधकामे नियमित करण्याचे आश्वासन देऊनही राज्यातील शिवसेना आणि भाजपा सरकारने हे आश्वासन पाळले नाही तर दुसरीकडे प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटीच्या घरांवर तोडक कारवाई सुरूच आहे, प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यायचा नाही आणि दुसरीकडे त्यांना कमी लेखून त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा संतापजनक प्रकार शिवसेना आणि भाजपाचे आमदार आणि खासदार यांनी चालविला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटीच्या घरांना झुग्गी झोपडी असे संबोधणार्या खासदार विचारे यांचं प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबतचं ज्ञान किती अगाध आहे हे नवी मुंबईकरांना दिसून आले आहे, असा टोला युवक जिल्हाध्यक्ष सुरज पाटील यांनी लगावला आहे