स्वयंम न्यूज ब्युरो
नवी मुंबई : कोपरखैरणे येथे बुधवारी नवी मुंबई शिक्षण संकुलाच्यावतीने दहावी आणि बारावीनंतर करियरच्या संधी या विषयावर मार्गदर्शनपर सेमिनार पार पडले. या सेमिनारमध्ये आपल्या पालकांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संकुलाचे संस्थापक लोकनेते गणेश नाईक यांच्या हस्ते या सेमिनारचे उद्घाटन झाले. कोणत्याही क्षेत्रात करिअर करा परंतु परिश्रमपूर्वक यश प्राप्त करून आपल्या पालकांनी तुमच्यासाठी घेतलेल्या कष्टाचे चीज करा, असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. शिक्षण आणि संस्कारांच्या शिदोरीवर आपले करियर घडवा, असा मोलाचा सल्ला त्यानी विद्यार्थ्यांना दिला.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये अधिक गुण मिळाले म्हणजे विद्यार्थ्यांचा कल हा वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शिक्षणाकडे असतो हा समज चुकीचा असून दहावी आणि बारावीनंतर करिअरच्या अनेक वाटा खुल्या असल्याचे मत या सेमिनारमध्ये उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले आहे.
संकुलाचे अध्यक्ष आणि या सेमिनारचे आयोजक आमदार संदीप नाईक यांनी दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कोणतेही क्षेत्र निवडताना स्वतःची आवड आणि स्वतःच्या क्षमता लक्षात घ्या., केवळ आपली मित्रमंडळी ठराविक अभ्यासक्रम घेते आहे म्हणून आपणही तो अभ्यासक्रम निवडावा, असे करू नये असा सल्ला त्यांनी दिला. आणखी करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्याचा मानस त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. प्राध्यापक प्रकाश सावंत यांनी दहावी आणि बारावी वाणिज्य शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेले अभ्यासक्रम आणि युवराज भोसले यांनी दहावी आणि बारावीनंतर विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध असणारे अभ्यासक्रम याविषयी खुलासेवार माहिती दिली. एखादा शैक्षणिक अथवा व्यावसायिक अभ्यासक्रम निवडताना त्यासाठी आवश्यक गुणवत्ता आणि गुणांविषयी मार्गदर्शन केले. कोणतेही करियर निवडा परंतु प्रामाणिकपणा आणि परिश्रम या गुणांच्या जोरावरच यश प्राप्त करू शकाल, असा सल्ला या दोघांनी विद्यार्थ्यांना दिला. बदलत्या अभ्यासक्रमांविषयी माहिती देऊन या अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया, त्यासाठी आवश्यक आर्हता आणि रोजगार स्वयंरोजगारासाठी त्यामधून घडणारे करिअर याविषयी विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले.