स्वंयम न्यूज ब्युरो
नवी मुंबई : “सारथी सुरक्षा” यांच्या माध्यमातून “ग्लोबल रोड सेफ्टी” चा उदघाटन मॉर्डन कॉलेज, वाशी येथे बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की. रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीने शिक्षण आणि अभियांत्रिकीच्या क्षेत्रात अभाव आढळतो. या क्षेत्रातील व्यक्तींनी आपआपल्या जबाबदाऱ्या ओळखून जिवित हानी टाळण्यासाठी काम करावे. रस्ता सुरक्षिततेसाठी जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. नवी मुंबई शहरात अपघातप्रवण स्थळी आर.टी.ओच्या मार्फत गतीरोधक तयार करावे. त्यामुळे अपघाताला आळा बसण्यास मदत होईल. शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत माहिती देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
सुरक्षेच्या बाबतीत हलगर्जीपणा केल्यास जीवनाची वाताहत होते असे सांगून आमदार सौ. मंदाताई म्हात्रे पुढे म्हणाल्या की, आपले जीवन सुरक्षित राहील अशा प्रकारचे नियम जीवनात अंमलात आणावे. रस्ता सुरक्षेसाठी जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांनी अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करुन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी. नशापाणी करुन कोणीही वाहन चालवू नये असे आवाहनही त्यांनी वाहन चालकांना दिला. अपघात टाळण्यासाठी दुचाकी चालकाने व मागे बसणाऱ्या दोन्ही व्यक्तींनी हेलमेटचा वापर करण्याबाबत सक्ती करण्यात यावी तसेच नशा करुन कोणीही वाहन चालविणार नाही असा संकल्प करावा व नवी मुंबई शहरात आवश्यक त्या ठिकाणी सिग्नल लावावे. विद्यार्थी व नागरिकांना रेल्वे उड्डाण पूल सुरक्षितपणे ओलांडता यावा यासाठी समांतर स्काय वॉक नावीन्यपूर्ण योजनेतून तयार करावे. रस्ता सुरक्षेसाठी प्रत्यक्ष कृतीवर भर द्यावा असेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले, मॉर्डन कॉलेजचे प्राचार्य व्ही.एस.शिवणकर, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण विश्वविख्यात जादुगार, सतीश देशमुख, आशिया खंडातील प्रथम युवा मेंटलिस्ट कु. किमया देशमुख, सारथी सुरक्षाचे संचालक श्री. प्रसन्ना कुमार व सारथी सुरक्षा प्रवक्ता विनय मोरे तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.