आमदार संदीप नाईक यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
स्वयंम न्यूज ब्युरो
नवी मुंबई : आमदार संदीप नाईक यांनी केलेल्या आवाहनाला उत्साहवर्धक प्रतिसाद देत नवी मुंबईकरांनी रविवारी गवळी देव आणि सुलाईदेवी या दोन पर्यटन स्थळांमध्ये साफसफाई मोहीम राबवली आणि वृक्षारोपण केले.
या मोहिमेमध्ये नवी मुंबईतील लोकप्रतिनिधी पर्यावरण प्रेमी व्यक्ती पर्यावरण प्रेमी संस्था महाविद्यालयीन विद्यार्थी, वनविभागाचे कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या दोन्ही पर्यटन स्थळ परिसरात टाकण्यात आलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, फुटलेल्या काचेच्या बाटल्या आणि इतर कचरा असा सुमारे ७००
किलोग्रामचा कचरा मोठ्या प्रमाणावर गोळा करण्यात आला. आमदार संदीप नाईक यांच्यासह माजी महापौर सुधाकर सोनावणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार विभागीय वन अधिकारी रामगावकर आदी मान्यवरांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. या दोन्ही पर्यटन स्थळांसाठी आमदार संदीप नाईक यांनी आपला 15 लाख रुपयांचा आमदार विकास निधी दिला होता. या निधीमधून गवळीदेव येथे विहिरीची डागडुजी आणि दोन्ही पर्यटन स्थळांमध्ये पायवाटेचे काम करण्यात आले आहे. नवी मुंबई महापालिकेने दोन्ही पर्यटन स्थळांच्या विकासासाठी दोन कोटी 80 लाखांचा निधी दिला आहे. त्यामधून चाळीस लाख रुपयांचा निधी वापरून काही कामे करण्यात आलेली आहेत. उर्वरित निधी एकत्रित वापरण्यासाठी वनविभागाने विकास आराखडा तयार केलेला आहे. या विकास आराखड्याला वनविभागाच्या पर्यावरण समितीची मंजुरी आवश्यक आहे. ही मंजुरी मिळवण्यासाठी आमदार संदीप नाईक पाठपुरावा करणार आहेत. या मोहिमे प्रसंगी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना आमदार नाईक यांनी ही दोन्ही पर्यटन स्थळे महाराष्ट्रात लौकिकास प्राप्त होण्याच्या दृष्टीने त्यांचा विकास होण्याची इच्छा व्यक्त केली. आवश्यकता पडल्यास अधिकचा आमदार विकास निधी आपण देऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले. पर्यटन स्थळ विकास आराखड्याअंतर्गत काम करताना ग्रामस्थांच्या आणि पर्यटकांच्या सूचना वनविभागाने लक्षात घ्याव्यात, असे आमदार नाईक म्हणाले. घनसोली परिसरातील भाविकांचे गवळी देव हे श्रद्धास्थान आहे तर गोठवली तळवली आणि परिसरातील भाविकांसाठी सुलाईदेवी हे श्रद्धास्थान आहे., मोठ्या संख्येने ग्रामस्थ या दोन्ही ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. पावसाळ्यामध्ये येण्या जाण्यासाठी पायवाट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि सोलार विद्युत दिव्यांची व्यवस्था असावी अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे. पर्यटन स्थळांचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा देखील महत्त्वाची आहे., त्यामुळे या ठिकाणी महापालिकेचा एखादा सुरक्षारक्षक नेमण्यात यावा, यासाठी महापौर महोदयांशी बोलणार आहे. त्याचबरोबर पोलिसांचे गस्ती पथक देखील येथे वरचेवर गस्तीसाठी यावे याकरिता पोलीस आयुक्तांना मागणी करणार आहे, अशी माहिती आमदार नाईक यांनी दिली. पर्यटकांनी निसर्गाचा आनंद घेताना येथील पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याची काळजी देखील घ्यावी असे आवाहन देखील केले. सुलाईदेवी च्या तुलनेमध्ये गवळीदेव येथे पक्ष्यांचा वावर कमी आहे याचे प्रमुख कारण येथिल फळ झाडांचा अभाव हे आहे असे ते म्हणाले त्यामुळे गवळीदेव परिसरात फळझाडांची लागवड करण्यात येणार आहे, असे त्यांनी नमूद केले. स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपणाची मोहीम पुढील चार आठवडे सुरूच राहील, असेही त्यांनी नमूद केले.