नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या कारभाराची पहिल्याच पावसात लक्तरे चव्हाट्यावर आली आहेत. प्रभाग ९६च्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याकडे महापालिका प्रशासनाकडे कानाडोळा केला. पहिल्याच पावसात नगरसेविका भगत यांच्या प्रभागात दि.१० जुलै रोजी रात्रीच्या वेळी पदपथावर असलेला पथदिवा उखडून रस्त्यावर पडण्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेबाबत स्थानिक नगरसेविका सौ. रूपाली भगत यांनी संताप व्यक्त केला असून यापुढे घटना घडून जिवित अथवा वित्त हानी झाल्यास त्यास महापालिका प्रशासनच जबाबदार राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
प्रभागातील नागरी समस्यांबाबत राष्ट्रवादीच्या नगरसेविका सौ. रूपाली भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने समस्या गंभीर रूप धारण करू लागल्या आहेत. पावसाळ्यात परिसरात कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होवून जिवित वा वित्त हानी होवू नये यासाठी पावसाळ्यापूर्वीच प्रभागातील पथदिव्यांबाबत पाहणी अभियान करून सडलेले, दुरावस्था असलेले पथदिवे तात्काळ बदली करावेत, पावसात दुर्घटना होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली होती. पावसाळ्यापूर्वी दिलेल्या तक्रारपत्रांकडे महापालिका प्रशासनाने नेहमीप्रमाणेच कानाडोळा केला असल्याचा आरोप नेरूळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष गणेश भगत यांनी केला आहे.
१० जून रोजी रात्री सुरू झालेल्या पहिल्याच पावसात नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांच्या प्रभागातील नेरूळ सेक्टर १६ येथील न्यू मंगलमूर्ती सोसायटीसमोरील पदपथावरील पथदिवा उखडून पूर्णपणे रस्त्यावर पडला. पथदिव्याचे तुकडे होवून पडले. सुदैर्वाने कोणतीही जिवित वा वित्त हानी झाली नाही. पथदिवा रस्त्यावरच पडला असल्याने समाजसेवक रवी भगत यांनी अक्षय काळे, सुर्या पात्रा, विकास तिकोने, राहूल गायकवाड, रूनाल सुर्वे या युवकांच्या मदतीने पथदिवा रस्त्यावरून हटविला व वीजही खंडीत केली.
पाऊस मुसळधार सुरू झाल्यास अजून दुर्घटना घडण्याची भीती नगरसेविका सौ. रूपाली भगत यांनी व्यक्त करतानाच यापुढे दुर्घटना घडून कोणत्याही प्रकारची जिवित अथवा वित्त हानी झाल्यास त्यास सर्वस्वी नवी मुंबई महापालिका प्रशासनच जबाबदार राहणार असल्याचा इशारा नगरसेविका रूपाली किसमत भगत यांनी दिला आहे.