नांदेड – गावाने बहिष्कार टाकल्यामुळे एका गर्भवती महिलेचा गर्भपात झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज एकविसाव्या शतकातही बहिष्काराची जीवघेणी परंपरा सुरू आहे. जिल्ह्यातील महिपाल पिंपरी या गावात लोकांनी पारधी कुटुंबावर बहिष्कार टाकला आहे. या कुटुंबातील महिलेच्या पोटात दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात नेणे गरजेचे होते. यासाठी महिलेच्या कुटुंबातील लोकांनी प्रवासी वाहतूक करणारे वाहन भाड्याने मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, कोणता वाहन चालक आला नाही. गावकर्यांच्या सांगण्यावरून वाहनधारकांनी त्यांचे भाडे घेणे टाळले.
पारधी कुटुंबावर बहिष्कार टाकल्यामुळे त्यांच्यातील गर्भवती महिलेच्या पोटात त्रास होत असतानाही तिला शहरात घेऊन गेले नाहीत. वाहनधारकांनी नकार दिल्याने शेवटी तिला जवळपास सहा किलोमीटर पायी चालावे लागले. त्यामुळे महिलेचा गर्भपात झाला. प्रचंड मरण यातना सहन करत हे जग पाहण्याअगोदरच पोटचा गोळा तिला गमवावा लागला. याप्रकरणी जबाबदार असणार्या संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी मंगलाबाई पवार यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी महिपाल येथील महिला मंगलाबाई पवार यांच्या पोटात अचानक दुखत असल्याने त्यांनी पिंपरी महिपाल ते नांदेड व वसमत मार्गावर चालणार्या प्रवाशी वाहनधारकांना रुग्णालयापर्यंत सोडण्याची मागणी केली. परंतु, गावकर्यांच्या सांगण्यावरुन तसेच गावकर्यांच्या दहशतीखाली असलेल्या वाहनधारकांनी त्यांना रुग्णालयापर्यंत सोडण्यास मनाई केली. वाहन न मिळाल्याने मंगला पवार व त्यांचे नातेवाईक जवळपास ६ किलोमीटर पायी चालत गेले. निळा फाट्यावरुन त्यांना वाहन मिळाले. परंतु, वसमत येथे रुग्णालयात पोहचल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून मंगलाबाई पवार यांचा गर्भपात झाल्याचे सांगितले.
गावकर्यांच्या दबावामुळे प्रवाशी वाहनधारकांनी देखील पारधी कुटुंबावर बहिष्कार टाकला असून या बहिष्काराबाबत यापूर्वीच पारधी महासंघाच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष शिला शिंदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले होते. त्यानंतरही पोलिसांनी खबरदारी न घेतल्यामुळे हा प्रकार घडला असून या प्रकारास जबाबदार असणार्या संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी मंगला पवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.