आ.सौ.मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने नोव्हेंबर 2017 मध्येच सीसीटीव्ही झाले होते मंजूर
नवी मुंबई :- नवी मुंबईतील नागरिकांच्या व महिलांच्या सुरक्षेतेसाठी आणि दिवसेंदिवस वाढत जाणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी नवी मुंबईतील महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी 1500 हून अधिक कॅमेरे बसविण्याचा महत्वाचा प्रश्न आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नाने नोव्हेंबर 2017 मध्येच मार्गी लागला होता. राज्य शासनातर्फे नवी मुंबईसाठी 1493 सी.सी.टीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस साहेब यांनी2017 मध्येच मंजूर केला होता तसेच आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतूनही संपूर्ण बेलापूर मतदारसंघात शेकडो सी.सी.टी.व्ही.कॅमेरे मंजूर करण्यात आले आहेत. सदर कामांचे श्रेय आमदार मंदाताई म्हात्रे यांना मिळू नये याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी सदर प्रस्ताव बारगळत ठेवण्यात आला. निवडणुक तोंडावर येताच आता इतकी वर्षे बारगळत ठेवण्यात आलेला प्रस्ताव घाईघाईने मंजूर करून श्रेय घेण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको प्रशासन व नवी मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्याने व सुचनेनुसार नवी मुंबईतील शाळा,महाविद्यालये,उद्याने,तलाव,बस डेपो,रेल्वे स्टेशन परिसर,सोसायटीत जाणाऱ्या चौकात,शासकीय कार्यालये,हॉटेल परिसर,मंडई,बाजार,चौक व इतर सार्वजनिक ठिकाणी हे सी.सी.टीव्ही कॅमेरे नवी मुंबईतील स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी एक “विशेष बाब” म्हणून राज्य शासनाकडे केली होती. राज्य शासनाने बेलापूर मतदारसंघासाठी सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्यास नोव्हेंबर 2017 मध्येच मंजुरी दिली आहे.परंतु महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी सदर प्रस्ताव जाणूनबुजून बारगळत ठेवत प्रत्येक वेळी त्यात खोडा घालण्यात आला. नवी मुंबईतील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसण्याकरिता चैन चोरी, दरोडा, महिला वर्गाला, मुली व जेष्ठ नागरिकांना या वाढत्या गुन्हेगारीचा होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळावी यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून व सुरक्षेतेच्या दृष्टीकोनातून सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. सदरच्या सी.सी.टीव्ही कॅमेऱ्याची जोडणी स्थानिक पोलीस स्टेशन मार्फत पोलीस आयुक्तालय करणार असून त्यामुळे जलद गतीने नवी मुंबईतील वाढत्या गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होणार आहे. नवी मुंबईतील संवेदनशील ठिकाणावर या सी.सी.टीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार असून गुन्हेगार त्वरित पकडले जाण्यास सहाय्य होईलच तसेच नवी मुंबईही सुरक्षित राहण्यास मोलाचे ठरेल. आता वाशी सेक्टर – 17, येथे आमदार निधीतून कॅमेरे बसविण्यात येत असताना सत्ताधाऱ्यांचा हा खटाटोप पाहून हास्यास्पद वाटत आहे. यापूर्वी वन टाईम प्लॅनिंग व मोरबे धरण येथील सोलरचे काम निवडणुकीच्या तोंडावर काढण्यात आले होते. काही सत्ताधारी नेत्यांनी त्यावेळी कंत्राटदार यांजकडून पैसे उकलविले होते व निवडणूक होताच सदर कामे बारगळली होती. यावेळीही त्यांचा तसाच प्रयत्न असल्याने कंत्राटदारांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले आहे.