मुंबई : महाराष्ट्राचे दिवंगत नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी देशाकरिता दिलेले योगदान जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेतला असून त्याकरिता माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या अध्यक्षतेखाली महोत्सव समितीचे गठन करण्यात आले आहे.
या समितीमध्ये माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आदींचा समावेश आहे. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत या समितीचे समन्वयक आहेत. या जन्मशताब्दी वर्ष सोहळ्याचा प्रारंभ १४ जुलै २०१९ पासून होत आहे. यानिमित्ताने वर्षभर संपूर्ण महाराष्ट्रात विविध सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.