राज्यभरात ठिकठिकाणी होणार सामाजिक, शैक्षणिक, उद्बोधनपर कार्यक्रम
स्वयंम न्यूज ब्युरो :
मुंबई : माजी केंद्रीय गृहमंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण राज्यभरात आयोजित करावयाच्या कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित झाली असून, पुढील वर्षभरात ठिकठिकाणी सामाजिक, शैक्षणिक, उद्बोधनपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
येत्या १४ जुलैपासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला प्रारंभ होत असून, यानिमित्त स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज चाकूरकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी टिळक भवन येथे झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीला वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, दिलीपराव देशमुख, आ. बसवराज पाटील मुरूमकर, माजी खासदार रजनीताई पाटील, जावेद खान, बी.ए. देसाई, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अनंतराव घारड, माजी आमदार दिप्ती चौधरी, जन्मशताब्दी समितीचे समन्वयक सचिन सावंत, श्रीकांत शिरोळे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, अभय मोकाशी, संजीव कुलकर्णी आदी निमंत्रित उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने या जन्मशताब्दी वर्षात मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार या बैठकीमध्ये संभाव्य कार्यक्रमांवर विचारविनिमय करण्यात आला. स्व.डॉ. शंकरराव चव्हाण यांनी कृषी, सिंचन, शिक्षण, सहकार अशा विविध क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेले असल्याने त्यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये त्यांच्या सर्वच क्षेत्रातील कार्याला उजाळा देणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना या बैठकीत मांडण्यात आली. राज्याच्या विविध विभागातून आलेल्या समितीच्या सदस्यांनीही आपआपल्या विभागात डॉ. शंकरराव चव्हाण यांनी केलेल्या कामाची माहिती देऊन कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात पुढाकार घेतला. ते देशाला आणि महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. त्यामुळे त्यांच्या योगदानाची विस्तृत माहिती देणारा एक ग्रंथ आणि संक्षिप्त पुस्तिकाही प्रकाशित करण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी राष्ट्रीय पातळीवर बजावलेली महत्त्वाची भूमिका बघता जन्मशताब्दी वर्षात नवी दिल्लीतही एका कार्यक्रमाचे आयोजन करण्याची सूचना यावेळी मांडण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुखपत्र ‘जनमानसाची शिदोरी’ने जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रकाशित केलेल्या विशेषांकाचे यावेळी प्रमुख नेत्यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.