स्वयंम न्यूज ब्युरो
नवी मुंबई : कचरा उचलण्यास गाड्या कमी, आहे त्या कचरा वाहक वाहनातील अधिकांश वाहनांमध्ये झालेला बिघाड आंणि कचरा वाहतुक व कचरा संकलन कर्मचाऱ्यांची कमतरता व पावसामुळे कामगारांची गैरहजेरी यामुळे नेरूळ नोडमध्ये गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये गेल्या पाच-सहा दिवसापासून कचरा उचलला जात नाही. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे गृहनिर्माण सोसायट्यांतील रहीवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
गेल्या काही दिवसापासून नेरूळ नोडमध्ये कचरा उचलण्याच्या कामाचा खेळखंडोबा सुरु आहे. पालिका प्रशासन व ठेकेदार तसेच कामगार संघटनांचे पुढारी संततधार पावसाचे कारण पुढे करत असले तरी खोलात जावून चौकशी केली असता गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात कचऱ्याचे ढिगारे निर्माण होण्यास पालिका प्रशासन व ठेकेदारच जबाबदार असल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली. कचरा वाहतुक करणाऱ्या गाड्यांमध्ये बिघाड झाला असून कागदावर दाखविल्या जाणाऱ्या कचरा वाहक गाड्यांपेक्षा कमी गाड्या रस्त्यावर धावत आहे. या गाड्याबाबत पालिका प्रशासनच अंधारात असून याबाबत पालिका प्रशासनाकडून ठेकेदाराला आजतागायत कधीही विचारणा झालेली नाही. मुळात कचरा वाहतुक विभाग सांभाळणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये उभ्या राहणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याबाबत काहीही स्वारस्य दाखवित नसल्याचा संताप स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त केला जात आहे.
कचरा उचलणाऱ्या गाड्या व कर्मचारी येत नसल्यामुळे नेरूळ नोडमध्ये ठिकठिकाणी सोसायट्यांच्या आवारात कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले आहेत. दोन ते चार दिवस कचऱ्याच्या गाड्या न आल्याने सोसायटी आवाराला आलेला बकालपणा व दुर्गंधीपासून सुटका होण्यासाठी रहीवाशांना नगरसेवकांची जनसंपर्क कार्यालय, शिवसेना शाखा, नगरसेवकांची घरे आणि नेरूळ विभाग कार्यालयात चकरा मारण्याची वेळ आली आहे.