महापालिका ब प्रभाग समिती सदस्य मनोज मेहेरची मागणी
सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबई : प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या विक्रेत्यांविरोधात तातडीने कठोरात कठोर कारवाई करावी अन्यथा नवी मुंबई महापालिका प्रशासनाने आम्हालाही प्लास्टिक पिशव्या वापऱण्याची परवानगी द्यावी अशी लेखी मागणी महापालिका ब प्रभाग समिती सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
महापालिका प्रशासनाने नवी मुंबई कार्यक्षेत्रात प्लास्टिक पिशवीविरोधात अभियान आपण राबवित आहात, त्याबाबत आपले अभिनंदन. मी छोटा व्यावसायिक असून उपजिविकेसाठी इडली, डोसा, मेंदूवडा विक्रीचा व्यवसाय करतो. पालिकेच्या अभियानाला आम्ही सकारात्मक प्रतिसाद देवून दुकानात येणाऱ्या ग्राहकांना पॅकींगचे साहित्य प्लास्टिक पिशवीतून देत नाही. घरूनच ग्राहकांना डबे घेवून येण्यास सांगितले आहे. तथापि नेरूळ नोडमध्ये आमच्या सभोवताली सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून व अन्य विक्रेत्यांकडून करताना आम्हाला पहावयास मिळाले. मग महापालिका प्रशासन राबवित असलेल्या प्लास्टिक पिशवी विरोधातील अभियानाचे काय झाले याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्लास्टिक पिशव्यांचा खुलेआम वापर पाहता पालिका प्रशासनाने हे अभियान थांबविले असल्यास आम्हाला लेखी कल्पना द्यावी. कारण प्लास्टिकमुक्ती केवळ आम्हीच राबवित असल्याचे दिसून आले. एकतर लवकरात लवकर सर्व खाद्यपदार्थ विक्रेते व अन्य विक्रेते यांची झाडाझडती घेवून प्लास्टिक मुक्ती अभियान गांभीर्याने राबवावे अन्यथा आम्हाला प्लास्टिक पिशव्या वापरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मनोज मेहेर यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.