नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमा राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने नेरुळ विभाग कार्यक्षेत्रातील रिलायन्स मार्ट, शिवाजीनगर, नेरुळ येथील व्यावसायिकाकडून 400 कि.ग्रॅ. प्लास्टिकच्या वस्तु जप्त करण्यात आल्या तसेच रु. 10 हजार इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आली.
त्याचप्रमाणे बिकानेर, नेरुळ येथे 11 कि.ग्रॅ. प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या व रु. 5 हजार इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आली. नेरुळचे विभाग अधिकारी संजय तायडे यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छता निरीक्षक जयश्री अढाळ, उप स्वच्छता निरीक्षक अजित तांडेल, विरेंद्र पवार, भुषण सुतार व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.
कारवाईअगोदर महापालिका ब प्रभाग समिती सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी नेरूळ नोडमधील प्लास्टिक पिशव्यांच्या वापराबाबत लेखी पत्र देत चिंता व्यक्त करत एकतर कडक कारवाई करा अथवा आम्हाला प्लास्टिक पिशव्या वापरण्याची परवानगी द्या अशी मागणी केली होती. या कारवाईनंतरही नेरूळ विभाग कार्यालयअंर्तगत क्षेत्रातील दुकाने, खाद्यपदार्थ विक्रेते अजूनही सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर करताना पहावयास मिळाले. त्यामुळे ही कारवाई ढोंग असल्याचा संताप मनोज यशवंत मेहेर यांनी व्यक्त केला आहेे.