स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com
पनवेल संघर्ष समितीच्या मागणीनुसार महापालिकेचा फिरला बुलडोझर
पनवेल ; पनवेल शहर आणि तालुक्याच्या परिक्षेत्रात मोकळ्या जागांवर खासगी विकसक, भंगार माफिया आणि दुकानदारांनी अतिक्रमण करून भुखंड लाटण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे गावे आणि शहरे बुडण्याच्या परिस्थितीत वाढ झाली आहे. कळंबोली ते तळोजे परिसरात केलेल्या अतिक्रमणावर आज कारवाई केल्याची माहिती महापालिका उपायुक्त जमिर लेंगरेकर यांनी दिली.
पनवेल-मुंब्रा महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी तेथील माती, राडारोडा टाकलेल्या भरावासह वाढत्या बेकायदेशिर दुकानांची छायाचित्रे पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी पनवेल महापालिकेचे उपायुक्त जमिर लेंगरेकर यांना सादर केली होती. वाढती अतिक्रमणे गाव आणि शहर बुडविण्यास धोकादायक ठरू शकतात, असे लेंगरेकर यांच्या निदर्शनास आणून दिले होते.
कर्मचार्यांच्या अपुर्या बळामुळे अतिक्रमण कारवाईत अडथळे येत असल्याचे गेल्याच आठवड्यात लेंगरेकर यांनी कडू यांना सांगितले होते. मात्र, परिस्थिती गंभीर असल्याने आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचे अवमान होत असल्याचे लेंगरेकर यांच्या लक्षात आणून देताच, त्यांनी आज पनवेल-मुब्रा मार्गावरील अतिक्रमणे काढून टाकण्याची कारवाई केली असल्याची माहिती कडू यांना दिली.
पनवेल संघर्ष समितीने आतापर्यत शेकडो अतिक्रमणे तोडण्यासाठी महापालिका, सिडकोकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे. शिवाय अतिक्रमणे तोडल्याने नागरिकांच्या पायाभूत सुविधांवरील ताण कमी होत आहे.
कालच कामोठ्यातील दूर्घटनेमुळे पदपथावरील अतिक्रमाणांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पदपथावर कोणतेही अतिक्रमण असू नये, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. पादचार्यांना चालण्यासाठी मोकळी जागा राहावी, यासाठी पदपथ मोकळे ठेवण्याचे आदेश असताना कामोठे येथील पदपथावर छोट्या मोठ्या विके्रत्यांनी बस्तान बसविले आहे.
यासंदर्भात लेंगरेकर यांच्याशी संपर्क साधून तिथेही महापालिकेचा बुलडोझर फिरवण्याची मागणी पनवेल संघर्ष समितीने आज केली असता, सिडकोने मेहरनजर ठेवून आरे दूध विक्रेत्यांचे लाड सुरू ठेवल्याची खंत व्यक्त केली. विशेष म्हणजे राजकीय नेत्यांनी त्यांच्या बगलबच्च्यांची उपजिविका सुरू राहावी म्हणून राजकीय दबावाने अनेक ठिकाणची पदपथे गिळंकृत केल्याने गंभीर प्रश्न उद्भवला असल्याची स्पष्टोक्ती त्यांनी दै. निर्भीड लेखशी बोलताना दिली.