नवी मुंबई:- नवी मुंबईतील पेट्रोल – डीजेलचे दर हे नवी मुंबईच्या बाहेरील दरापेक्षा जास्त असल्याने नवी मुंबई मधील पेट्रोल व डीजेलवरील अतिरिक्त कर रद्द केल्यास नवी मुंबईतील पेट्रोल-डीजेलचे दर कमी करणेबाबत नवी मुंबईतील पेट्रोल-डीजेल डीलर्सच्या शिष्टमंडळासह बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी नवी मुंबई पेट्रोल-डीझेल डीलर्सच्या शिष्टमंडळातील बीपीसीएल कंपनीचे हरबन सिंग, विवेक शिंदे, एचपीसीएल कंपनीचे गौतम सिंग, अजित कांडपिले, आयओसिएल कंपनीचे कृष्णा शिंदे, साईनाथ उपस्थित होते.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, भारत सरकारने GST सारखा कर अस्तित्वात आणल्याने विविध प्रकारचे इतर कर एकाच कराच्या दरात आले. परंतु पेट्रोल-डीजेल वरील इतर कर अजूनही अस्तित्वात आहेत. अशा विविध कराच्या दरामुळे पेट्रोल-डीजेलचे संपूर्ण महाराष्ट्रातील दरामध्ये व नवी मुंबईमधील दरामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे. 20 वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या मुंबईतील सुमारे 35पुल, ठाणे बाईपास पुल आणि नवी मुंबई बायपास पुलच्या काही पायाभूत सुविधांसाठी नवी मुंबईकरांवर पेट्रोलवर 1% आणि डिझेलवर 3% अतिरिक्त व्हॅट सेस लावण्यात येत आहे. यामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्र आणि आसपासच्या भागातील पेट्रोल-डीजेलच्या किंमतीमध्ये फरक पडतो. सद्यस्थितीत नवी मुंबई बाहेरील पेट्रोलचे दर रु.78.61 (25%व्हॅट सेस) व डीझेलचे दर रु.68.07(21%व्हॅट सेस) असताना नवी मुंबईतील पेट्रोलचे दर रु.79.00 (26% व्हॅट सेस) व डीझेलचे दर रु.69.55 (24% व्हॅट सेस) आहेत. देण्यात येत असलेल्या पायाभूत सुविधांकरिता नवी मुंबईतील नागरिक टोलच्या नावाने अतिरिक्त शुल्क भरत आहे. त्यामुळे पेट्रोल-डीजेलवर नवी मुंबईला इतर दर आणि नवी मुंबई बाहेर वेगळे दर हा नवी मुंबईकरांवर अन्याय आहे. नवी मुंबईमध्ये पेट्रोल व डीजेलवरील अतिरिक्त कर रद्द करून कराचा दर हा इतर जिल्ह्याप्रमाणे केल्यास नवी मुंबईतील पेट्रोल व डीजेलच्या किमती कमी होऊन नवी मुंबईकरांना दिलासा मिळेल.