स्वयंम न्यूजब्युरो : navimumbailive.com@gmail.com
साईनाथ सोसायटीतील गरिबांना महापालिकने ऐन पावसाळ्यात रस्त्यावर आणले.
मुंबई : महानगरपालिकेने बिल्डरच्या फायद्यासाठी साकीनाका भागातील साईनाथ सोसायटीत ४० वर्षांपासून राहत असलेल्या लोकांच्या घरांवर हातोडा चालवून त्यांना बेघर केले आहे. महानगरपालिकेने केलेली ही कारवाई अन्यायी व नियमबाह्य असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
साईनाथ सोसायटीला विरोधी पक्षनेते वडेट्टीवार आणि उपनेते नसीम खान यांनी भेट दिली व स्थानिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, मोहिली भागातील या सोसायटीत ८०० घरे असून त्याला झोपडपट्टी म्हणून घोषीत करण्यात आलेले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या डीपीनुसार हा ग्रीन झोनही आहे. ग्रीन झोनमध्ये पुनर्विकासाचे कसलेही काम करता येत नाही, या झोपड्यांना सरकारचे संरक्षणही आहे असे असताना महानगरपालिका कारवाई कशी काय करते ? पावसाळ्यात घरे तोडण्याची कारवाई करता येत नसतानाही महापालिका ही कारवाई कशी काय करु शकते, असा जाब त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारला.
एसआरएच्या नावाखाली नागपूरच्या एका बिल्डरने महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून इथल्या रहिवाशांना धमकावले. जे लोक घरे खाली करणार नाहीत त्यांच्याच घरांवर कारवाई केली. बिल्डरच्या आमिषाला बळी पडून ज्यांनी पुनर्विकासासाठी संमती दिली त्यांच्या घरांवर मात्र महापालिकेने हातोडा चालवलेला नाही.या घरांच्या शेजारीच दोन मजली, तीन मजली झोपड्या असताना त्यांच्यावरही कारवाई केली जात नाही, मात्र बिल्डरला संमती न दिलेल्यांवर मात्र कारवाई केली जात असल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले. या बिल्डरने याआधी देवनार भागातील लोकांनाही अशीच आमिषे दाखवून घरे खाली करुन घेतली व नंतर त्यांची फसवणूक केलेली आहे. आता मात्र या बिल्डरच्या कोणत्याही धमक्यांना घाबरु नका, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.
विधानसभेतील उपनेते व स्थानिक आमदार नसीम खान यांनीही महापालिकेच्या कारवाईवर संताप व्यक्त करुन पुन्हा बेकायदेशीर कारवाई केली तर महानगरपालिका आयुक्तांच्या कार्यालयावर मोर्चा काढून जाब विचारु असा इशारा दिला.