सुवर्णा खांडगेपाटील : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध नागरी कामांच्या महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांचेमार्फत स्थायी समितीपुढे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांस सभापती नविन गवते यांच्या अध्यक्षतेखाली मंजूरी प्राप्त झाली.
यामध्ये – सेक्टर 9 घणसोली येथील भूखंड क्र. ३ वर मुख्य औषध भांडारगृह बांधणे तसेच त्याठिकाणी आवश्यक उपकरणे व स्वयंचलित (Automation) व्यवस्था करण्याच्या कामास मंजूरी देण्यात आली. सद्यस्थितीत महानगरपालिकेचे मुख्य औषध भांडारगृह हे बेलापूर येथील माता बाल रूग्णालय इमारतीत असून ही जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे घणसोली सेक्टर ९ मध्ये ९४९.८६ चौ.मी.च्या सिडकोकडून हस्तांतरित झालेल्या भूखंड क्र. ३ यावर मुख्य औषध भांडारगृह बांधणे प्रस्तावित करण्यात आले आहे. याठिकाणी ३ मजली इमारत बांधण्यात येणार असून तळमजल्यावर ३ कार्यालये, १ भांडार गृह, लोडींग व अनलोडींग क्षेत्र तसेच पहिल्या मजल्यावर ४ भांडारगृहे असणार आहेत. दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर प्रत्येकी १ कार्यालय व १ भव्य भांडारगृह रचना प्रस्तावित आहे. या इमारतीत १ प्रवासी लिफ्ट तसेच १ सामानासाठी लिफ्ट असणार आहे. याव्दारे आरोग्य विभागास औषधे संग्रहण व वितरणाकरिता स्वतंत्र इमारत उपलब्ध होणार असून प्रशस्त जागा उपलब्धतेमुळे कामात सुनियोजितता प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे, स्थायी समितीने बेलापूर विभागात सेक्टर ४४, नेरूळ येथील सिडकोकालीन नादुरूस्त गटारे व पदपथ दुरूस्ती व सुधारणा कामांसही मान्यता दिलेली आहे. याठिकाणी बऱ्याच प्रमाणात गटारे तुटलेली व नादुरूस्त असल्याने गटाराचा आकार लहान होऊन गटारे साफसफाई करण्यास अडथळा जाणवतो आहे तसेच पाण्याचा निचराही व्यवस्थित होत नाही. त्यामुळे गटारे, पदपथांची कामे झाल्यानंतर नागरिकांचा हा त्रास दूर होणार आहे. त्यादृष्टीने महत्वाच्या असलेल्या या कामास स्थायी समितीची मंजूरी लाभली.
अशाचप्रकारे, दूरवस्था झालेल्या वाशी सेक्टर 11 येथील विनम्र स्वराज्य हॉस्पिटल ते सेक्टर ९ वाशी येथील रिषभ सोसायटी समोरच्या मुख्य रस्त्याची डांबरीकरणाने सुधारणा करणेच्या प्रस्तावासही स्थायी समितीने मंजूरी दिलेली आहे. या रस्त्यालगत शाळा, विद्यालये, रूग्णालये, उद्यान असून मोठ्या प्रमाणात रहिवासी व वाणिज्य वापर आहे. त्यामुळे अत्यंत खराब अवस्था झालेल्या या १८०० मी. लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण करून सुधारणा करण्यात येत आहे. या योगे नागरिकांची व वाहनांची चांगली सोय होणार आहे.
याशिवाय, वाशी सेक्टर ९ येथील धर्मवीर संभाजी राजे उद्यान / मैदान व लगतच्या मोकळ्या जागेची सुधारणा व सुशोभिकरण करणे कामासही स्थायी समितीची मान्यता लाभलेली असून १५,९९९ चौ.मी. इतक्या मोठ्या जागेची सुधारणा करून नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या उद्यानाची भिंत जुनी असून ती ठिकठिकाणी नादुरूस्त झालेली आहे. तसेच भिंतीवरील ग्रीलही वाकलेली व तुटलेली आहे. या ठिकाणचे पेव्हर ब्लॉकही काळानुरूप खराब झालेले असून नागरिकांना याचा त्रास होत आहे. त्या अनुषंगाने ही कामे हाती घेणे प्रस्तावित असून त्यास स्थायी समितीची मान्यता लाभलेली आहे. अशा विविध नागरी सुविधा कामांस स्थायी समितीची मंजूरी प्राप्त झालेली आहे.