सुवर्णा खांडगेपाटील : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सिवूडस सेक्टर ४८ मधील महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची पूर्णपणे दुरावस्था झाली असून महापालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे या उद्यानाला आज बकालपणा आलेला आहे. उद्यानातील समस्या सोडविता येत नसतील, उद्यानात सुविधा देता येत नसतील तर महामानवांचे नाव त्या उद्यानावरून काढून टाकावे अशी संतप्त भावना स्थानिक भागातील रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
डीएव्ही शाळेच्या बाजूने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम आपणास उद्यानाचा दरवाजा तुटलेल्या अवस्थेत निदर्शनास येतो. उद्यानाचे प्रवेशद्वार तुटलेले असून एका बाजूला कलले आहे. उद्यानाता कोठेही पायवाट नसल्याने तसेच पेव्हर ब्लॉक न बसविल्याने स्थानिक रहीवाशांना चिखल तुडवितच उद्यानात ये-जा करावी लागत आहे. सकाळच्या वेळी काही रहीवाशी त्या उद्यानात आपली पाळीव कुत्री प्रातविधीसाठी आणत असल्याने उद्यानात ठिकठिकाणी दुर्गंधीही पसरली आहे. उद्यानात लहान मुलांच्या खेळण्याच्या ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डबकी झाली असून पाण्याचा निचरा होण्याची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे उद्यानात येणाऱ्यांना व सभोवतालच्या गृहनिर्माण सोसायटीतील रहीवाशांना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. या खेळण्यालगतच उद्यानातील झाडांच्या तुटलेल्या फांद्यांचे ढिगारे असून वेळीच न उचलल्याने ते आजमितीला कुजलेल्या अवस्थेत आहेत. उद्यानाच्या एका कोपऱ्यात तुटलेली खेळणी असून उद्यानात ठिकठिकाणी सुकलेल्या फांद्यांचा कचरा दिसत आहे. शेजारच्या गृहनिर्माण सोसायटीतील नारळाच्या सुकलेल्या फांद्या लोंबकळत असून उद्यानाला बकालपणा आलेला आहे. उद्यानात असलेले पथदिव्याची झाकणे उघडीच असून पावसाच्या पाण्याचा व त्या वीजेचा संपर्क झाल्यास दुर्घटना होण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
उद्यानात असलेल्या ओपन जीमच्या ठिकाणीही पाणी साचले असून तेथेही पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नसल्याने पाण्याचे डबके झाले आहे. उद्यानात कंपोस्ट खत म्हणून कुंडी व छप्पर पालिकेने बसविले आहे. तथापि तेथेही पालिकेचा नाकर्तेपणा स्पष्टपणे दिसतो. कंपोस्ट खताची कुंडी एका बाजूला व झाडाच्या सुकलेल्या फांद्या व अन्य कचरा आजूबाजूला विखुरलेला आहे. उद्यानात ठिकठिकाणी दारूच्या व पाण्याच्या बाटल्या पहावयास मिळत आहे.
उद्यनातून पलिकडे बाहेर पडताच श्रीगणेश मैदान चालू होते. या मैदानाचेही प्रवेशद्वार तुटलेले असून संरक्षक लोखंडी जाळ्याही तुटलेल्या आहेत. या मैदानात गणपतीचा अथवा देवीची मूर्ती आणण्यासाठी वापरण्यात येणारा मोठा लाकडी पाट बेवारस अवस्थेत पडलेला आहे.
सिवूडस परिसरात आंबेडकरी समाजाचे प्राबल्य असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तर सर्वाचेच श्रध्दास्थान. घटनाकारांचे नाव दिलेल्या उद्यानाची दुरावस्था पाहून स्थानिक रहीवाशांत पालिका प्रशासनाप्रती संताप व्यक्त केला जात आहे. घटनाकारांच्या नावाने असलेल्या उद्यानाला बकालपणाचे, दुर्गंधीचे स्वरूप असेल तर तात्काळ त्या उद्यानाच्या नामफलकावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव हटवून पालिका प्रशासनाने आपला नाकर्तेपणा कायमस्वरूपी ठेवावा, कारण ठिकठिकाणी बकालपणा असतानाही महापालिकेला पुऱस्कार मिळत असताना काम कशाला करायचे असा समज महापालिका प्रशासनाचा झाला असल्याचा संतापही यावेळी स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत होता.