सुवर्णा खांडगेपाटील : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : बदलत्या राजकीय घडामोडीमुळे नवी मुंबईतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शरद पवारांचे कडवट समर्थक असणाऱ्या अशोक गावडेंना शरद पवारांच्याच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मानाची पदे न मिळता अडगळीत राहावेही लागले होते. परंतु नाईक समर्थकांचा भाजपच्या कमळाप्रती ‘लळा’ वाढीस लागताच बारामतीकरांना नेरूळ श्रीगणेश सोसायटीतील आपल्या एका ‘अवजड’ समर्थकाची आठवण आली व सुरू झाल्या फोनाफोनी. नवी मुंबईतील शरद पवारसमर्थकांचे ७९५९४ या मोबाईलवर कॉल वाढू लागल्याने नवी मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेसची धुरा लवकरच शरद पवारांशी घरोब्याचे समर्थक असणाऱ्या नगरसेवक अशोक गावडे यांच्या खांद्यावर सोपविली जाणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
नवी मुंबईत पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांना पर्यायाने राष्ट्रवादी कॉंग्रेसला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. कोपरखैराणे, जुईनगर, नेरूळ, सिवूडस, घणसोली, ऐरोली या ठिकाणी शरद पवार समर्थकांचे मोठ्या प्रमाणावर निवासी वास्तव्य आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवरील कृषी मालाशी संबंधित मार्केटवर आजही शरद पवारांचाच प्रभाव आहे. मार्केट आवारातील घटकांचे शरद पवारांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते व या घटकांचे नवी मुंबईतील निवासी वास्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसला अल्पावधीतच नवसंजीवनी प्राप्त करून देणार असल्याचा विश्वास पवार समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
नाईक समर्थक पदाधिकारी व नगरसेवक कोणत्याही वेळी भाजपमय होण्याची चिन्हे दिसू लागताच बारामतीकरांनी आपला पक्ष सांभाळण्यासाठी विश्वासू शिलेदारांना योग्य सूचना देत संपर्कात राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नाईक समर्थक नगरसेवक गेले तरी पवार समर्थक असणाऱ्या स्थानिक भागातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीतच राहण्याचा निर्णय घेतल्याचे आता अनेक प्रभागामध्ये उघडपणे पहावयास मिळत आहे. नगरसेवक भाजपात गेल्यास आता आपणास राष्ट्रवादीकडून पालिका निवडणूक लढविण्याची संधी मिळणार हे आता उघड होवू लागल्याने पवार समर्थकांकडून भाजपात जाण्यास आता टाळाटाळ करण्यास सुरूवात झाली आहे. अशोक गावडे यांनी पाच वर्षापूर्वीही पालिका निवडणूकीअगोदर नाईक समर्थक भाजपात जाण्याची चाचपणी करत होते, त्यावेळीही अशोक गावडे यांनी उघडपणे शरद पवार समर्थनाची भूमिका घेत मिडीयासमोर बाजू मांडण्यास नकार दिला होता. आजही ते शरद पवार समर्थक या आपल्या भूमिकेवर ठाम असून त्यांनी कोणी कुठे गेले तरी आपण पवारांना सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
उद्या नाईकांसोबत नाईक समर्थक नगरसेवक व पदाधिकारी भाजपमय झाल्यास नवी मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेसची धुरा अशोकशेठ गावडे यांनाच सांभाळावी लागणार असून मार्गदर्शकाची भूमिका आमदार शशिकांत शिंदेंना वठवावी लागणार आहे.