स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : प्रभाग समितीच्या माध्यमातून प्रभाग समिती सदस्यांची कामे होत नाही, बोलण्याची संधी मिळत नाही, सभागृहात जे बोलतो, विषय मांडतो त्याची पालिका प्रशासनाकडून इतिवृत्तात नोंदही होत नसल्याच्या निषेधार्थ महापालिका ब प्रभाग समितीचे सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे दिला आहे.
आपण सुचविलेली विकासकामे होत नाहीत, नागरी समस्या सोडविल्या जात नाहीत. त्यामुळे प्रभाग समितीमध्ये केवळ नामधारी म्हणून राहण्यास आपल्याला स्वारस्य नसल्याचे सांगत मनोज मेहेर यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.
सारसोळे गावचे विकासपर्व म्हणून मनोज मेहेरचा नवी मुंबईत परिचय आहे. नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावाच्या विकासासाठी पाच वर्षात ७ हजाराहून अधिक निवेदनातून सिडको, मंत्रालय, महापालिका, पोलिस मुख्यालय, गणेश नाईकांचा जनता दरबार आदी ठिकाणी मनोज मेहेरने केलेला पाठपुरावा व मारलेले हेलपाटे नवी मुंबईकरांनी जवळून पाहिला आहे. नवी मुंबईतील ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यासाठीही मनोज मेहेरचा सतत मंत्रालय दरबारी पाठपुरावा असतो. आता पदमुक्त झालेला हा सारसोळेचा वाघ कोणत्या राजकीय व्यासपिठावरून पुन्हा श्रीगणेशा करत दणकेबाज पुनरागमन करतो याची नवी मुंबईकरांनाही उत्सुकता लागून राहीली आहे.