स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील मातब्बर प्रस्थ आणि राज्यातील सहकार क्षेत्रातील दिग्गज म्हणून ओळखले जाणारे नवी मुंबई महापालिकेतील नगरसेवक व माजी उपमहापौर अशोक गावडे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केल्याने नवी मुंबईतील राजकारण ढवळून निघाले आहे. नवी मुंबई शिल्पकार, लोकनेते व ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक हे अजून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असले तरी येत्या काही दिवसात ते नवी मुंबईतील नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. वाशी रेल्वे स्टेशनसमोरील वाशी एक्झिबिशनस सेंटरमध्ये जंगी कार्यक्रमाचे आयोजन करत हा सोहळा भव्य दिव्य होणार असल्याचेही सूत्रांकडून सांगितले जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांपैकी अधिकांश नगरसेवक नाईक समर्थक असले तरी बारा-तेरा नगरसेवक हे शरद पवार समर्थक असल्याने ते राष्ट्रवादी कॉंग्रेस कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यात कदाचित अजून दोन – तीन नगरसेवकांची भर पडणार आहे. यामध्ये प्रामुख्याने अशोक गावडे यांचे नाव चर्चिले जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील शिल्लक राहणाऱ्या नगरसेवकांचे व नवी मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेतृत्व अशोक गावडे यांच्यावर शरद पवार सोपविणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. एकतर शरद पवार, सुप्रियाताई सुळे, अजित पवार व दिलीप वळसेपाटलांशी असलेली जवळीक व गेल्या काही वर्षात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवा नगरसेवकांकडून मिळालेली मानापमानची वागणूक यामुळे अशोक गावडे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
२००५ सौ. निर्मला गावडे या नवी मुंबई महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०१० साली अशोक गावडे हे नवी मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. त्याअगोदर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मार्केटचे ते ९ वर्षे संचालक होते. केंद्र सरकारच्या फूड प्रोसेंसिंग या महामंडळाचे अशोक गावडे पाच वर्षे संचालक होते. २०१५ साली अशोक गावडे व त्यांची कन्या सपना गावडे हे दोघेही नवी मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अधिकांश घटक भाजपमध्ये जाणार नसल्याची बाब राष्ट्रवादी कॉंग्रेसला दिलासा देणारी आहे.
अशोक गावडे यांना एकतर शरद पवार, सुप्रियाताई सुळे, अजित पवार हे नावाने ओळखत असून दिलीप वळसेपाटील हे गावडे यांचे मित्र आहेत. वळसेपाटील यांच्या पत्नी किरणताई व अशोक गावडे यांचे भावाबहींणीसारखे नाते आहे. त्यातच गावडे यांचे मेहूणे सुरेश घुले हेही बारामतीकरांचे विश्वासू असून सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती अजित पवारांसमवेत घुले यांनी घेतल्या आहेत. नेरूळ नोडमधील एका युवा नगरसेवकामुळे अनेक घटक नाराज असुन त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. खुद्द त्या युवा नगरसेवकाच्या प्रभागातील दोन वॉर्ड अध्यक्ष देखील राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अशोक गावडे यांच्या संपर्कात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेतेमंडळी असून नवी मुंबईतील घडामोडींची इंत्यभूत माहिती घेतली जात आहे. शरद पवारांना आपण कधीही सोडणार नसल्याचे अशोक गावडे सातत्याने सांगत असल्याने ते पवारांवरील प्रेमापायी राष्ट्रवादी सोडणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. गावडे यांना मानणारा नेरूळमधील पश्चिम महाराष्ट्रातील घटक मोठ्या प्रमाणावर असून बाजार समिती आवारात आजही गावडेंच्या नावाचा दबदबा आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची पडझड झाल्यास राष्ट्रवादीच्या डागडूजीची धुरा अशोक गावडेंनाच करावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.