पर्यावरणप्रेमी संदीप नाईकांनी दिल्या कार्यकर्त्यांना सूचना
सुवर्णा खांडगेपाटील : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : रविवारी, ४ ऑगस्टला वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा द्यायला येताना कोणी पेढे, पुष्पगुच्छ न आणता वेगवेगळ्या झाडांची रोपटी आणावीत की जेणेकरून मला त्या रोपट्यांचे रोपण करून संवर्धन करता येईल, त्यामुळे येताना रोपटीच घेवून येण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमी आमदार अशी महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर प्रतिमा जोपासलेल्या संदीप नाईकांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे.
नेरूळ संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त काशिकृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शनिवार, दि. ३ ऑगस्ट रोजी नेरूळ सेक्टर २० मधील नवी मुंबई महापालिका शाळा क्रं. १० येथे सकाळी १० ते सांयकाळी ५ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. समाजसेवक देवनाथ म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला भेट दिल्यावर संदीप नाईक यांनी कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधताना त्यांनी हे आवाहन केले आहे.
गेली दहा वर्षे महाराष्ट्राच्या विधानभवनात वावरताना उभ्या महाराष्ट्राने त्यांना स्वच्छ प्रतिमेचा एक अभ्यासू आमदार म्हणून जवळून अनुभवले आहे. त्यामुळे विधानभवनात संदीप नाईकांविषयी नेहमीच आदराने बोलले जाते. नवी मुंबईकर मात्र संदीप नाईकांना एक पर्यावरणप्रेमीच म्हणून ओळखतात. दरवर्षी पावसाळ्यात आपल्या ग्रीन होप या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी नवी मुंबईत लाखोच्या संख्येने वृक्षारोपण केलेले आहे व त्यातील अधिकाधिक वृक्षाचे जतन व संवर्धन त्यांनी यशस्वीपणे केले आहे. उद्या होणाऱ्या वाढदिवसालाही त्यांनी केवळ वृक्षाची रोपटी घेवून येण्याचे आवाहन करताना आपली पर्यावरणप्रेमी प्रतिमा कृतीतून जोपासण्याचा प्रयत्न केला आहे.
सकाळपासून सुरु झालेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. संदीप नाईक यांनी रक्तदान शिबिराला भेट दिली त्यावेळी कार्यक्रमाचे आयोजक देवनाथ म्हात्रे, स्थानिक नगरसेवक गिरीश म्हात्रे, पत्रकार संदीप खांडगेपाटील, परिवहन समिती सदस्य निरंत पाटील, वॉर्ड अध्यक्ष अक्षय पाटील, सोशल मिडीयाचे हरेश भोईर, दिनेश गवळी, अक्षय काळे व नेरूळ गावातील ग्रामस्थ तसेच रक्तदाते उपस्थित होते.