स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : “प्लास्टिकमुक्त नवी मुंबई” ही संकल्पना नजरेसमोर ठेवून प्लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आले असून प्लास्टिक पिशव्यांना पर्यायी कागदी वा कापडी पिशव्यांचा वापर करणेबाबत महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधन करण्यात येत आहे. प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा राबविण्यात येत आहेत.
या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तुषार पवार, परिमंडळ उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार व डॉ. अमरिश पटनिगेरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविभ विभागांत धडक मोहीमा राबविण्यात आल्या. यामध्ये तुर्भे विभागात सहाय्यक आयुक्त समीर जाधव यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छता अधिकारी सुधाकर वडजे आणि स्वच्छता निरीक्षक, उपनिरीक्षक यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकावर कारवाई करीत ६०० किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त केले तसेच ५ हजार रूपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल केली.
अशाचप्रकारे, नेरूळ विभाग अधिकारी संजय तायडे यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २५० किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त केले व ५ हजार इतका दंड वसूल केला.
घणसोली विभागातील व्यावसायिक तसेच फेरीवाल्यांवर सहाय्यक आयुक्त दत्तात्रय नागरे यांच्या नियंत्रणाखाली, स्वच्छता अधिकारी विनायक जुईकर आणि सहकाऱ्यांनी कारवाई करीत १६ किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त केले तसेच ४ व्यावसायिकांकडून २० हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल केली.
नागरिकांनीच प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद केला तर आपोआपच प्लास्टिकला प्रतिबंध होईल हे लक्षात घेऊन सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी आपले नवी मुंबई शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.