मुंबई : श्रावण महिना आणि भाजी खाणाऱ्या खवय्यांचा सुगीचा काळ हे समीकरण वर्षानुवर्ष कायमच राहीलेले आहे. आज श्रावण महिन्याच्या सोमवारी मात्र मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील भाजी मार्केटमध्ये मात्र भाज्यांची आवक मंदावल्याने किरकोळ विक्रेत्यांना भाज्या महाग दराने खरेदी कराव्या लागल्या. याची झळ स्थानिक बाजारातही उमटली असून महिलांना भाज्या खरेदीसाठी आज अव्वाच्या सव्वा रूपये मोजावे लागले आहेत.
श्रावण महिन्यात मटण, मच्छि वर्ज्य असल्याने एक महिना भाज्यावर समाधान मानावे लागते. त्याच सोमवार व शनिवारच्या जेवणात विविध भाज्यांची मेजवानी ही ठरलेलीच असते. आज भाजी मार्केटमध्ये भाज्यांची आवक मंदावल्याने भाज्या मार्केटमध्ये चढ्या भावानेच विकल्या जात असल्याचे गाळ्यागाळ्यावर पहावयास मिळाले.
मार्केटमध्ये शेतकऱ्यांकडून भाज्या कमी आल्याने मेथीच्या भाजीची जुडी २५ ते ३० रूपयाने विकली गेली. कोथिंबीरीची जुडीही ५ ते १५ रूपये दरानेच विकली गेली. अळूची पाने २४० रूपये शेकडा, वाटाणा ६० ते ८० रूपये किलो, गवार ७० ते ८० रूपये किलो, भेंडी ३० ते ४० रूपये किलो, फ्लॉवर ७० ते ८० रूपये किलो, कोबी २४ ते ३० रूपये किलो, टॉमटो ४० ते ४८ रूपये किलो या दराने किरकोळ विक्रेत्यांना खरेदी कराव्या लागल्या.
भाज्यांची आवक घटल्याने टॉमटो, फ्लॉवर, मेथीच्या दरामध्ये कमालीची वाढ झाली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून तसेच परराज्यातून सरासरी ४०० ते ४२५ वाहनातून या मार्केटमध्ये भाज्या विक्रीसाठी येत असतात. याशिवाय ठाणे जिल्ह्यातूनही काही प्रमाणात भाजी विक्रीसाठी येत असते. सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यत जेमतेम ३००च्या आसपासच वाहनातून विक्रीसाठी भाज्यांची आवक झाल्याने भाज्या महागल्या. रविवारी मार्केट बंद असल्याने इतरवेळी सोमवारी अनेकदा ५१० ते ५४० वाहनातून भाज्या विक्रीला येत असतात. आज भाज्याच कमी आल्याने व्यापाऱ्यांना चढ्या दराने भाज्या विकल्या.
मुख्य मार्केटमध्येच भाज्या महाग दराने किरकोळ विक्रेत्यांना खरेदी कराव्या लागल्याने त्यांनी स्थानिक भागात महिलांना २० ते ३० टक्के अधिक दराने भाज्या विकल्या. स्थानिक बाजारात मेथीची जुडी ४० ते ६० रूपयाला विकली गेली. अळू ३० रूपये ते ३५ रूपये जुडी (ज्यात अळूची चार ते पाच पाने), गवार ९० ते १०० रूपये किलो, फ्लॉवरही ९० ते १२० रूपये किलो दराने विकली गेली. इतर भाज्यांच्या बाबतीतही हेच चित्र कायम होते. श्रावण महिन्यात भाज्या घरातील अर्थकारणाचे कंबरडे मोडणार असल्याची प्रतिक्रिया गृहीणींकडून व्यक्त करण्यात येत होती.