मुंबई : सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ येथे बोट उलटून गेलेले ११ बळी हे अपघाताचे नसून, सरकारची तुटपुंजी उपाययोजना व प्रशासकीय बेपर्वाईचे बळी असल्याची संतप्त टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.
या घटनेबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे म्हटले आहे. या अपघाताचे वृत्त आल्यानंतर अशोक चव्हाण यांनी ब्रह्मनाळमध्ये संपर्क साधून संपूर्ण माहिती घेतली. त्याआधारे प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, स्थानिकांनी तहसील प्रशासनाकडे बोटीची मागणी केली होती. परंतु, ग्रामपंचायतकडे बोट असल्याने ब्रह्मनाळला बोट देण्याची गरज नाही, असे बेपर्वाईचे उत्तर देऊन ही मागणी फेटाळण्यात आली. प्रशासनाने हात वर केल्यामुळे गावकऱ्यांना नाईलाजास्तव ग्रामपंचायतची गळकी बोट वापरावी लागली व हा अपघात घडला. प्रशासनाने वेळीच बोट पुरवली असती किंवा ग्रामपंचायतची बोट वापण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी पाठवले असते तर ११ निरपराध नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले नसते. त्यामुळे सरकारला या अपघाताची जबाबदारी नाकारता येणार नाही. एक तर राज्य सरकारने पुरेशी उपाययोजना केली नाही. आवश्यक तेवढ्या बोटी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून दिल्या नाहीत. शिवाय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बेपर्वाई केल्याने हा अपघात झाला असून, सरकारने याची नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.