सुजित शिंदे : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेरूळ तालुकाध्यक्षपदी महादेव पवार यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी त्यांना आज नियुक्तीपत्रही दिले. पश्चिम महाराष्ट्रातील माणसाची नेरूळ तालुकाध्यक्षपदी निवड करताना जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी आक्रमक मोर्चेबांधणीला सुरूवात केल्याचे बोलले जात आहे.
गेली १३ वर्षे नेरूळच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात महादेव पवार सक्रिय असून यापूर्वी ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रभाग ८६च्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळत होते. २०१५च्या महापालिका निवडणूकीदरम्यान त्यांनी मनसेतून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१० साली त्यांनी मनसेकडून सारसोळे व नेरूळ सेक्टर सहा परिसरातून त्यांनी महापालिकेची निवडणूकही लढविली होती. ते स्वत: एक व्यावसायिक असून सामाजिक कार्यातून तळागाळातील वर्गाशी तसेच व्यवसायाच्या निमित्ताने त्यांचा घरटी जनसंपर्क चांगल्यापैकी आहे. दत्तकृप्पा सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळ, नवरात्रौत्सव मंडळ या माध्यमातून ते सांस्कृतिक व धार्मिक कार्यातही आपले योगदान देत आहेत.
नेरूळ पश्चिमला सेक्टर परिसरात तसेच गावठाणातही पश्चिम महाराष्ट्राचा वर्ग निवासी स्वरूपात मोठ्या प्रमाणावर विखुरलेला आहे. हा वर्ग प्रामुख्याने शरद पवारांना मानणारा आहे. महादेव पवार यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लढवय्ये नेतृत्व व माथाडी नेते आमदार शशिकांत शिंदे यांचे नेरूळ सेक्टर ६ परिसरात निवासस्थान आहे. सातारा भागातील महादेव पवारांची नेरूळ तालुकाध्यक्षपदी झालेली निवड पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देणारी असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी पक्षबांधणीची आक्रमक केलेली सुरूवात पाहता आगामी निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस ताकदीनिशी उतरणार असल्याचे चित्र एव्हाना स्पष्ट झाले आहे.