सुजित शिंदे : navimumbailive.com@gmail.com
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा निवडणूकीपूर्वी सुजय विखेंच्या भाजपप्रवेशानंतर ‘मुले पळविणारा पक्ष’ असा विरोधी पक्षांकडून भाजपवर आरोप करण्यात आला. त्या आरोपाला उत्तर देताना फोडाफोडीमधील भाजपचे राज्यपातळीवर ‘मास्टरमाईंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांनी मुलेच काय पण आपण आजोबाही पळविणार असल्याचा इशारा देत विरोधी पक्षांना आणखी हादरे देण्याचा इशारा दिला होता. यानंतरही कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फोडाफोडी करत राज्याच्या शहरी व ग्रामीण भागात भाजपला बळकटी आणण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व फोडाफोडीचे तज्ज्ञ गिरीश महाजन यांनी सातत्यानी चालविला आहे. ठाण्याच्या राजकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईलाच हादरा देत ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांना भाजपात घेत सुजय विखेपाटील प्रकरणाची पुनरावृत्ती केली आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका अवघ्या दीड ते पावणे दोन महिन्यावर येवून ठेपलेल्या असताना गणेश नाईक भाजपमध्ये कधी प्रवेश करणार, याचीच चर्चा ठाण्याच्या राजकारणात सुरू असून मोदी व अमित शहा यांच्या उपस्थितीत नाईकांचा भाजपप्रवेश होणार असल्याच्या चर्चेवर आता राजकारणातील चावडी गप्पांमध्ये पैंजाही झडू लागल्या आहेत.
आपल्या आमदारकीचा राजीनामा देत संदीप नाईकांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेतृत्व व नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक यांनीही संदीप नाईकांसवेत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे ५२ नगरसेवकांचे संख्याबळ असून ५ अपक्ष नगरसेवकांचे त्यांना समर्थन आहे. संदीप नाईकांपाठोपाठ ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक व ठाण्याचे माजी खासदार संजीव नाईक तसेच महापालिकेतील किमान ४५ ते ४८ नगरसेवकांचा ताफा नजीकच्या काळात कोणत्याही क्षणी भाजपात विलिन होण्याची कुणकुण लागताच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी नवी मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेसची डागडूजी करताना आपले विश्वासू साथीदार व नवी मुंबईचे माजी उपमहापौर अशोक गावडे यांची नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. अशोक गावडे, सपना गावडे, सानपाड्यातील बोऱ्हाडे, तुर्भेतील पाटील व सुरेश कुलकर्णीसह त्यांचे तीन नगरसेवक असे आठ नगरसेवक आज राष्ट्रवादीकडे असून ५२ पैकी ४४ नगरसेवक खुलेआमपणे गणेश नाईक समर्थक म्हणून नवी मुंबईत वावरत आहेत. अपक्षांमध्ये पाचही नगरसेवक नाईकांसोबत जाणार असल्याचे एव्हाना निश्चित झाले आहे.
संदीप नाईक व सागर नाईक भाजपात गेले असतानाच गणेश नाईक, संजीव नाईक व महापालिकेतील नगरसेवक भाजपात कधी प्रवेश करणार याचीच ठाणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाला उत्सूकता लागलेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गणेश नाईकांची प्रतिमा मातब्बर राजकारण्यात मोडत असून १९९० ते १९९९ आणि २००४ ते २०१४ या काळात त्यांनी महाराष्ट्राच्या विधानभवनात आमदार म्हणून काम केले आहे. १९९५ ते १९९७ या काळातही त्यांनी शिवशाही सरकारच्या काळात त्यांनी मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे. २००४ ते २०१४ या काळात त्यांनी आघाडी सरकारचे मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम सांभाळले आहे. गणेश नाईकांचे जनता दरबार हा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलेला आहे. गणेश नाईक आमदार असताना १९९० साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नावारूपालाही नव्हते. १९९५ ला गणेश नाईक मंत्री व पालकमंत्री असताना फडणवीस हे नागपुर शहराचे महापौर होते. सध्या भाजपमध्ये राज्यस्तरावर देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, गिरीश महाजन हे आघाडीचे नेतृत्व असले तरी राज्याच्या राजकारणात हे गणेश नाईकांना ‘ज्युनिअर’ आहेत. त्यामुळे फडणवीस व पाटलांच्या हातून गणेश नाईकांचा भाजप प्रवेश राजकीय संकेतांना व राजकीय नीतीमूल्यांना धरून उचित नसल्याने लवकरच नवी मुंबईत विशेष भव्य दिव्य कार्यक्रम सोहळ्याचे आयोजन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत गणेश नाईकांचा, संजीव नाईकांचा व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील ४५ पेक्षा अधिक नगरसेवकांचा भाजपप्रवेशाचा कार्यक्रम घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील कार्यक्रम अजून निश्चित झाला नसला तरी विविध तारखांबाबत वावड्या उठत आहेत. त्यामुळे गणेश नाईकांचा संभाव्य भाजप प्रवेश हा सध्या तरी ठाणे जिल्ह्यातील चर्चेचा व उत्सूकतेचा विषय बनला आहे.