- नवी मुंबईतून झाल्या ५ उमेदवारांच्या मुलाखती
- लोकसभेसाठी नवी मुंबईतून झाले वंचितला २४, ९९३ मतदान
- ऐरोलीतून खॉजामिया पटेल तर बेलापुरातून विरेंद्र लगाडेंची चर्चा
- उमेदवार कोण याची सेना-भाजपसह कॉंग्रेस-राष्ट्रवादीला उत्सूकता
मुंबई : लोकसभेला महाराष्ट्रामध्ये भाजप-शिवसेनेला घवघवीत यश मिळून कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ‘पानिपता’हून भयानक पिछेहाट झाली. महायुतीच्या यशात मोदी नावाचा करिश्मा असला तरी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला थोपविण्यातच नाही तर आघाडीच्या उमेदवारांना पराभूत करण्यात वंचित बहूजन आघाडीची भूमिका निर्णायक ठरली. महाराष्ट्रात तब्बल ४२ लाखाहून अधिक मते वंचित बहूजन आघाडीला मिळाली. अशोक चव्हाणांसह सुशीलकुमार शिंदेपर्यत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसचे रथी-महारथींना पराभवामुळे आज घरी बसावे लागले आहे. विधानसभा निवडणूक आता अवघ्या दीड महिन्यावर आलेल्या असताना उमेदवार निवड व मुलाखतीबाबत आघाडी व महायुतीत शांतता असली तरी वंचित बहूजन आघाडीने मंगळवारी ठाणे जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यामुळे निवडणूक लढवू पाहणाऱ्या प्रस्थापितांचे व इच्छूकांचे धाबे दणाणले आहेत.
नवी मुंबई कार्यक्षेत्रात ऐरोली व बेलापुर हे दोन विधानसभा मतदारसंघ मोडत असून सध्या या ठिकाणी ऐरोलीतून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संदीप नाईक व बेलापुरातून भाजपच्या मंदा म्हात्रे या आमदार आहेत. संदीप नाईक यांनी नुकताच आपल्या आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये वंचित बहूजन आघाडीला बेलापुर विधानसभेतून ९ हजार ८०८ तर ऐरोली विधानसभा मतदारसंघातून १५ हजार १८५ मते मिळाले. दोन्ही मतदारसंघातून सुमारे २४ हजार ९९३ मते वंचित आघाडीला मिळाली आहेत. लोकसभा निवडणूकीच्या तोंडावरच वंचित बहूजन आघाडीची स्थापना झालेली होती आणि लोकसभेसाठी वंचितने उभा केलेला उमेदवार नवी मुंबईकरांना फारसा परिचित नसतानाही २५ हजार मते वंचितला नवी मुंबईतून मिळाली.
मंगळवारी वंचित बहूजन आघाडीकडून ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासाठी इच्छूकांच्या मुलाखती घेण्यात आल्या, त्यात नवी मुंबईतील ऐरोली व बेलापुर या दोन विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. बेलापुर मतदारसंघासाठी विरेंद्र लगाडेंसह अजून एकाने तर ऐरोली मतदारसंघासाठी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष खॉजामियॉ पटेल यांच्यासह अजून दोघांनी अशा एकूण नवी मुंबईतून पाचजणांनी वंचितकडून उमेदवारी मिळावी म्हणून मुलाखती दिल्या आहेत. नवी मुंबईतून ऐरोलीसाठी खॉजामियॉ पटेल यांना तर बेलापुरसाठी विरेंद्र लगाडे यांनाच तिकिट मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. लोकसभा निवडणूकीत वंचित बहूजन आघाडीचा उमेदवार नवी मुंबईकरांसाठी अपरिचित असला तरी विधानसभा निवडणूकीसाठी खॉजामियॉ पटेल व विरेंद्र लगाडे हे दोन्ही चेहरे परिचित असून त्यांची उमेदवारी आघाडी व महायुतीलाही त्रासदायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
खॉजामियॉ पटेल हे अनेक वर्षापासून रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष म्हणून नवी मुंबईत कार्यरत असून दिघा ते बेलापुरदरम्यान ते परिचित आहेत. त्यांना कोणी पाहिले नसले तरी तुर्भेचे खॉजामियॉ पटेल या नावाने नवी मुंबईकर त्यांना जाणतात. तळागाळातील नवी मुंबईकरांमध्ये त्यांचा परिचय असून वंचितकडून ऐरोली विधानसभेसाठी त्यांचा दावा प्रबळ मानला जात आहे. बेलापुर विधानसभा मतदारसंघातून विरेंद्र लगाडे यांचा दावा प्रबळ मानला जात असून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात लगाडेंचा असलेला संपर्क इच्छूकांसाठी व प्रस्थांपितांसाठी त्रासदायक ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व आता वंचित बहूजन आघाडी असा त्यांचा राजकीय प्रवास असून त्यांनी शिवसेनेकडून पालिका निवडणूकही लढविलेली आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात योगदान आहे. कला संस्थेच्या माध्यमातून संगीत व गायन क्षेत्रामध्ये त्यांनी तळागाळातील घटकांना नावारूपाला आणले आहे. वंचितचे नेते ही अल्पावधीत विरेंद्र लगाडेंची निर्माण झालेली ओळख बेलापुर विधानसभा निवडणूकीला कलाटणी देण्याची भीती राजकीय क्षेत्रात व्यक्त केली जात आहे.
साभार : दै. नवराष्ट्र