ठेकेदाराचे बिल थांबवावे व त्यास काळ्या यादीत टाकण्याची मनोज मेहेर यांची मागणी
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर चार येथील सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी चौथऱ्याचे काम निकृष्ठ दर्जाचे असल्याचे सांगत या कामाची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष व महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून सध्या नेरूळ सेक्टर ४ येथील सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यविधीच्या लोखंडी चौथऱ्याचे काम सुरू आहे. या स्मशानभूमीत एकाच वेळी पाच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची सुविधा आहे. तसेच बाजूलाच लहान मुलांचीही दफनभूमी आहे. या चौथऱ्याचे काम अंत्यत निकृष्ठ पध्दतीचे सुरू असून पालिका प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार सुरू आहे. काम गलथान व निकृष्ठ दर्जाचे होत असतानाही पालिका प्रशासन कानाडोळा करत असताना या कामाला पालिका अधिकाऱ्यांचाही आर्शिवाद असल्याचा संशय व संताप आम्हा सारसोळे ग्रामस्थांना येत असल्याचे मनोज मेहेर यांनी तक्रारपत्रात म्हटले आहे.
आज या स्मशानभूमीतील अंत्यविधीच्या चौथरा कामाची मी पत्रकारांसमवेत पाहणी केली असता, पाचपैकी चौथ्या चौथऱ्याचे कोणत्याही प्रकारचे काम झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे. अंत्यविधीसाठी वापरण्यात आलेला पाचवा चौथरा हा जुनाच असून त्यावर केवळ रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. या पाचव्या चौथऱ्यावर रंगरंगोटीशिवाय काहीही काम करण्यात आलेले नाही. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या चौथऱ्यावर अंत्यविधीच्या ठिकाणी मृतदेहाखाली येणारा भाग हा नव्याने लोखंडी जाळी बसविण्यात आली आहे. तथापि या तीनही चौथऱ्यावर अंत्यविधीसाठी मृतदेह ठेवल्यावर बाजूच्या दोन्ही ठिकाणचे कठडे हे जुनेच असून त्यावरही केवळ रंगरंगोटीचा मुलामा देण्यात आला आहे. हे बाजूकडच्या दोन्ही भागातील कठडे आताच ठिकठिकाणी तुटल्याचे मी पत्रकारांना निदर्शनास आणून दिले. आजच्या पत्रकारांसमवेतच्या पाहणी अभियानात समस्येचे फोटो व चित्रीकरणही केलेले असल्याचे मनोज मेहेर यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
समस्येचे गांभीर्य व कामातील गलथानपणा पाहता निवेदन मिळताच आपण घटनास्थळी येवून समस्येची पाहणी करून या कामाबाबतचा जाब काम करत असलेल्या ठेकेदाराला व कामाची पाहणी करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना विचारावा. काम व्यवस्थित झाल्याशिवाय कामाचे देयक देवू नये. काम पूर्ण झाल्यावरच या कामाची पाहणी सारसोळे ग्रामस्थांना करून द्यावी. कारण ही स्मशानभूमी आम्हा सारसोळेच्या ग्रामस्थांची आहे. कामामध्ये हाच प्रकार कायम राहील्यास या ठेकेदाराचा काळ्या यादीत समावेश करून हे काम नव्या ठेकेदाराकडून करून घ्यावे. आपण जेव्हा पाहणी करायला जाल त्यावेळी आम्हालाही घेवून जावे अशी मागणी मनोज मेहेर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
०००००००००० ००००००००००००० ०००००००००००००० ००००००००००००००००००००
ज्या ठिकाणी अंत्यविधी होतात, किमान त्या ठिकाणचे कामतरी चांगले असावे. त्या कामात कोणत्याही प्रकारचा गलथानपणा नसावा व थुकपट्टी नसावी, इतकीच आमची माफक अपेक्षा आहे. चौथऱ्यावरील कठडे आताच काम सुरु असताना ठिकठिकाणी तुटल्याचे निदर्शनास आले आहे. या कामाची पाठराखण करून पालिकेने कानाडोळा केल्यास याप्रकरणी उपलब्ध फोटो व चित्रीकरणाच्या आधारावर मुख्यमंत्री, पालकमंत्री व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या निदर्शनास हा प्रकार आम्ही आणून देणार आहोत.
:- मनोज यशवंत मेहेर