मुंबई.: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री तसेच पंतप्रधान म्हणून उल्लेखनीय काम केलेले आहे. २००८ च्या जागतिक मंदीच्या रेट्यातही भारतीय अर्थव्यवस्थेला त्याची झळ बसू दिली नाही त्याचे सर्व श्रेय डॉ. मनमोहनसिंग यांनाच जाते. भारताला जागतिक पातळीवर मान मिळवून दिलेल्या डॉ. मनमोहनसिंग यांना ‘भारतरत्न’ देऊन यथोचित सन्मान करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, डॉ. मनमोहनसिंग यांनी १९९१ साली अर्थमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतली तेव्हा देश मोठ्या आर्थिक संकटातून जात होता. त्यानंतर त्यांनी मांडलेला अर्थसंकल्प भारताच्या स्वातंत्र्योत्तर आर्थिक इतिहासात आर्थिक सुधारणांचे रणशिंग फुंकणारा ठरला. त्यांनी देशाचे नवीन औद्योगिक धोरण जाहीर करून करप्रणाली व इतर धोरणात्मक मोठे बदल केले.यामुळे देशाची अर्थव्यवस्था अंतर्बाह्य बदलण्यास सुरुवात झाली, आर्थिक सुधारणेचे नवे पर्व सुरु झाले आणि जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण हा देशव्यापी मंत्र बनण्यास सुरुवात झाली. डॉ. मनमोहनसिंग यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळेच भारताने नंतरच्या काळात आर्थिक वृद्धीदरात मोठी कामगिरी केली. २००८ च्या जागतिक मंदीची अमेरिकेसारख्या बलाढ्य देशालाही झळ बसली. या मंदीत अमेरिकेने भारतातील हजारो तरुणांना नोकरीवरून काढून भारतात परत पाठवले. नोकरी कपातीची मोठी मोहिमच अमेरिकेत राबवण्यात आली होती. सर्व जग आर्थिक मंदीचा मुकाबला करत असताना डॉ. मनमोहनसिंग यांचा आर्थशास्त्राचा गाढा अभ्यास, दूरदृष्टी नेतृत्व, देशाला सावरण्याची जिद्द तसेच आर्थिक धोरणे खंबीरपणे राबवल्यामुळेच जागतिक मंदीत भारत होरपळला नाही. त्यांनी राबवलेल्या आर्थिक सुधारणांमुळेच भारताने आर्थिक महासत्तेकडे वाटचाल सुरु केली. अर्थमंत्री तसेच पंतप्रधान असताना डॉ. मनमोहनसिंग यांनी देश मोठ्या कौशल्याने आर्थिक संकटातून बाहेर काढला त्याचे महत्व आजच्या आर्थिक अराजकतेच्या काळात जाणवत आहे.
सध्याच्या सरकारची आर्थिक धोरणे फसल्यामुळे भारतासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकलेले आहे. फसलेली नोटबंदी व जीएसटीमुळे उद्योगधंदे मेटाकुटीला आले आहेत. आज त्याचे परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. वाहन उद्योग, वस्त्रोद्योग तसेच गृहनिर्माण क्षेत्रावरही मंदीचे मोठे आरिष्ट्य ओढवलेले आहे. अनेक मोठ्या उद्योगांमध्ये काम बंद करण्याची नामुष्की ओढवलेली असून लाखो कामगारांचा रोजगार हिरावला जात आहे. सरकारला उद्योगपतींकडे रोजगार कपात न करण्याची तसेच संपूर्ण काम बंद न करता आठवड्यातून तीन दिवसच काम बंद ठेवावे अशी विनवणी करावी लागत आहे. आर्थिक धोरणे फसल्यामुळेच सरकारला रिझर्व्ह बँकेकडून १.७६ लाख कोटी रुपये घ्यावे लागले आहेत. भारतासमोर एवढे मोठे संकट उभे ठाकले असताना सध्याच्या सरकारने राजकीय मतभेद बाजूला ठेऊन देशहितासाठी मोठ्या मनाने डॉ. मनमोहन सिंग यांच्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी त्यांचा सल्ला घ्यावा व भारताला या आर्थिक संकटातून सावरण्याचा प्रयत्न करावा. डॉ. मनमोहनसिंग यांना जगभरातून अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. भारत सरकारनेही डॉ. मनमोहन सिंग यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा तसेच देशाला दिलेल्या योगदानाचा विचार करता त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ने त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे