स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते सोमवारी सांयकाळी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व विद्यार्थ्याचा गुणगौरव उत्साहात करण्यात आला. या कार्यक्रमाचे नगरसेवक सुरज पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व प्रभाग ८५च्या कार्यसम्राट नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील आणि प्रभाग ८६च्या नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर यांनी आयोजन केले होते.
सालाबाद प्रमाणे याही वर्षी नगरसेवक सुरज पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने आयोजित करण्यात आलेल्या “ सन्मान ज्येष्ठांचा, गुणगौरव विद्यार्थ्यांचा ’’ या कार्यक्रमाला प्रभाग क्र ८५ व ८६ मधील जेष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक, महापौर जयवंत सुतार, माजी परिवहन समिती सभापती प्रदीप गवस, नेरूळ गावचे नगरसेवक गिरीश म्हात्रे, अशोक त्रिपाठी, गणेश रसाळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व पाहुण्यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप तसेच १० वी,१२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शालेय वस्तुचे वाटप करुन सन्मान करण्यात आला. दोन्ही प्रभागात होत असलेल्या विकास कामांबद्दल तसेच सभागृहात करत असलेल्या नागरी कामांच्या पाठपुराव्या बाबत दोन्ही नगरसेविकांचा गणेश नाईक व महापौर जयवंत सुतार यांनी विशेष उल्लेख करत प्रशंसा केली. सारसोळे जेठीसमोर पामबीच येथे नगरसेविका व महिला व बालकल्याणच्या सभापती सौ. सुजाता सुरज पाटील यांच्या मागणीनुसार महापौर निधीमधून उभारल्या जात असलेल्या आगरी कोळी संस्कृती दर्शक शिल्पाबाबत महापौर जयवंत सुतारांनी सभापती सुजाता पाटील यांची प्रशंसा केली व लवकरच त्या शिल्पाचे अनावरण करण्याचे घोषित केले.
सभापती सुजाता पाटील या स्वत: वाणिज्य शाखेच्या द्विपदवीधर असून प्रभागातील दोन्ही महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा त्या सातत्याने आढावा घेत असल्याची माहिती कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या स्थानिक रहीवाशांनी दिली.