सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ / navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. संदीप नाईकांपाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील मातब्बर राजकीय नेतृत्व असणारे माजी पालकमंत्री गणेश नाईक व माजी खासदार संजीव नाईक कोणत्याही क्षणी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. संदीप नाईकांच्या भाजपप्रवेशाने ऐरोली मतदारसंघातील सुशिक्षित युवा वर्ग खऱ्या अर्थाने सुखावला असून ‘सुशिक्षित माणसाचा एका सुशिक्षित वर्तुळात प्रवेश झाला असल्याची’ प्रतिक्रिया ऐरोली विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षितांकडून व्यक्त केली जात आहे.
मागील लोकसभा निवडणूकीत मोदी लाटेमुळे शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी तत्कालीन खासदार डॉ. संजीव नाईक यांचा २ लाख ८४ हजार मतांनी पराभव केला. त्यानंतर अवघ्या ६ महिन्यांनी झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत बेलापुरातून गणेश नाईक पराभूत झाले. ऐरोलीचा गड राखण्यात संदीप नाईकांना यश आले असले तरी भाजपने या मतदारसंघात ४५ हजार मते घेतली होती. तथापि त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणूकीत मोदीचा लाट प्रभावशाली न ठरता नवी मुंबईकरांनी गणेश नाईकांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवित नवी मुंबई महापालिका राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोपविली.
राज्यात व केंद्रात भाजप-सेनेची सत्ता असल्याने नवी मुंबई शहराच्या विकासासाठी सातत्याने मंत्रालयात हेलपाटे मारताना काही प्रमाणात अडथळे निर्माण होत होते. केंद्रात पुन्हा ३०० हून अधिक जागा मिळवित भाजपने एकहाती सत्ता मिळविली आहे. राज्यात सध्या भाजपचीच लाट असल्याने ऑक्टोबर २०१९ मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत भाजप सत्तेवर येणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मागील महिन्यात ३१ जुलै २०१९ रोजी संदीप नाईकांनी माजी महापौर सागर नाईकांसमवेत भाजपात प्रवेश केला.
संदीप नाईकांनी भाजपात प्रवेश केल्यावर महिन्याभराच्या कालावधीत राष्ट्रवादीतील अनुभव व भाजपमधील अनुभव यातील विरोधाभास दिसून येत आहे. संदीप नाईकांनी भाजपात प्रवेश केल्याचा आनंद ऐरोली विधानसभा मतदारसंघातील युवकांकडून विशेषत: शिक्षित व उच्चशिक्षित घटकांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. ही युवा पिढी आता स्वत:हून संदीप नाईकांच्या भेटीगाठी घेवू लागली आहे. संदीप नाईक राष्ट्रवादीत असतानाही ठराविक समाज जो राजकारणात सक्रिय नव्हता, असा समाजही संदीप नाईक भाजपात आल्यावर संदीप नाईकांच्या संपर्कात आला आहे. सुशिक्षितांमध्ये पंतप्रधान मोदींविषयी कमालीचे आकर्षन व प्रेम आहे. त्यातच संदीप नाईक भाजपामय झाल्याने हा युवा वर्ग अनायसे स्थानिक पातळीवर संदीप नाईकांकडे जुळला गेला आहे. राजकारणातील स्वच्छ प्रतिमा, इंग्रजीवर प्रभूत्व, संपर्कात आल्यावर कोणतीही राजकीय भाषा न वापरता सतत विकासकामांची चर्चा, नवनवीन प्रकल्पांची गरज, समस्या सोडविण्यासाठी करावयाचे प्रयत्न यावरच संदीप नाईकांकडून भर दिला जात असल्याने युवा पिढीकडून संदीप नाईकांच्या नेतृत्वाबाबत आशावाद व्यक्त केला जावू लागला आहे. भाजपाची व्होटबॅक, संदीप नाईकांची पारंपारिक मते, संदीप नाईकांना मानणारा वर्ग, युवा पिढीचा वाढता संपर्क पाहता ऐरोली विधानसभेतून संदीप नाईक ‘रेकॉर्डब्रेक’ विजय मिळविण्याची भीती आता खुद्द विरोधकांकडूनच व्यक्त केली जावू लागली आहे.