महापालिका प्रशासनातून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीच्याच दिवशी त्याचा सर्व हिशोब करून धनादेश देण्याची इंटकची मागणी
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४: navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका प्रशासनातून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीच्याच दिवशी त्याचा सर्व हिशोब करून धनादेश देण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनात काम करून सेवानिवृत्त (रिटायर्ड) झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेचे पैसे मिळविण्यासाठी पालिका प्रशासनात सहा ते सात महिने तर कधी वर्षभर हेलपाटे मारावे लागतात. पालिका कर्मचार्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच त्यांचा सर्व हिशोब मिळाल्यास त्यांना सेवानिवृत्तीनंतर त्रास सहन करावा लागणार नाही. त्यांचा सर्व हिशोबाचे पैसे घेण्यासाठी त्यांना या टेबलावरून त्या टेबलावर फिरावे लागते. कार्यालयीन कामकाजादरम्यान पडलेले सीआर (गोपनीय अहवाल) क्लिअर करण्यासाठी त्या त्या संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या मिळविण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात. मुळातच आयुष्यभर काम करून आपण केलेल्या कामाचा हिशोब घेण्यासाठी कर्मचार्यांना निवृत्तीनंतरही हेलपाटे मारावे लागणे ही कामगार क्षेत्रासाठी शोकांतिका आहे. सेवानिवृत्तीनंतरचे सुखी जीवन न जगता हिशोब मिळविण्यासाठी साठीच्या वयात त्यांना करावी लागणारी धावपळ ही पालिका प्रशासनासाठी नामुष्कीची बाब असल्याचे रवींद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
कामगारांचे सीआर (गोपनीय अहवाल) बनविणे, त्याचा अहवाल बनविणे ही कामे त्या त्या विभागाच्या प्रमुखांची (एचओडी)असतात. परंतु संबंधित अधिकारी वेळेवर ही कामे पार पडत नसल्याने कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर ही ससेहोलपट सहन करावी लागते. मुळातच नवी मुंबई महापालिका ही ग्रामपंचायतीमधून थेट महापालिकेत रूपांतरीत झालेली महापालिका आहे. केंद्र व राज्य पातळीवर या महापालिकेला पुरस्कार मिळत असले तरी काही ठिकाणी प्रशासनाचे अपयश स्पष्टपणे पहावयास मिळते. कर्मचार्यांची पदोन्नती, असुविधा, समस्या, सेवानिवृत्तीनंतरचा हिशोब व कर्मचारी-अधिकारी यांचे अन्य प्रश्न सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाने स्वतंत्र अधिकारी नियुक्त करून संबंधितांंना पूर्ण वेळ त्याच कामाची जबाबदारी सोपवावी. सेवानिवृत्तीच्याच दिवशी कामगारांचा त्यांचा सर्व हिशोब मिळणे आवश्यक आहे. जेणेकरून सेवानिवृत्तीनंतर त्यांना होणारा त्रास संपुष्ठात येईल. आपण समस्येचे गांभीर्य पाहता लवकरात लवकर सकारात्मक प्रतिसाद देवून सेवानिवृत्तीच्याच दिवशी कर्मचाऱ्यांना त्यांच सर्व हिशोब मिळेल यासाठी कार्यवाही करण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.