नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील महापालिकेच्या उद्यानात व क्रिंडागणात संगीत यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
महापालिका नेरूळ विभाग कार्यालयाचे विभाग अधिकारी संजय तायडे यांना दिलेल्या लेखी निवेदनात मनोज मेहेर यांनी म्हटले आहे की, नवी मुंबई महापालिका प्रभाग ८६ मध्ये महापालिकेचे राजमाता जिजाऊ उद्यान व तानाजी मालुसरे क्रिडांगण हे बाजूबाजूलाच आहे. या उद्यानात व क्रिडांगणात सकाळी व संध्याकाळी सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशी व ग्रामस्थ चालण्यासाठी (मॉर्निग वाक) व विसावा घेण्यासाठी येत असतात. यामध्ये महिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.नेरूळ सेक्टर ८ मधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यानात काही महिन्यापूर्वीच संगीत यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे. त्याधर्तीवर या विभागातील उद्यानात संगीत यंत्रणा लवकरात लवकर सुरू करावी. ज्यामुळे सकाळी व संध्याकाळी उद्यानात येणाऱ्या रहीवाशांना भावगीते व अन्य गीते ऐकावयास मिळतील. त्यांचे मन प्रसन्न राहील. थकवा गायब होईल. स्थानिक रहीवाशांना दिलासा देण्यासाठी आमच्या मागणीचा सकारात्मक विचार करून अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याची मागणी मनोज मेहेर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.