सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : भाजपच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या आक्रमक प्रवृत्तीच्या, तापट, जे आहे ते रोखठोक बोलुन मोकळ्या होणाऱ्या, सपष्टवक्त्या. अशा विविध रूपांमध्ये आमदार मंदाताई म्हात्रेंना गेल्या तीन दशकाच्या वाटचालीत नवी मुंबईकरांनी जवळून पाहिले आहे. परंतु आमदार मंदा म्हात्रे या फणसासारख्या वरून काटेरी आणि आतून मधाळ व गोड समाजकारणी असल्याची त्यांची प्रतिमा विविध अनुभवातून नावारूपाला येवू लागली आहे.
नोव्हेंबर महिना उजाडला तरी राज्यातून पाऊस काढता पाय घेण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. त्याची फार मोठी किंमत बळीराजाला चुकवावी लागत आहे. बळीराजा व त्याची शेती अडचणीत आहे. सरकार बळीराजाला उभा करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. परंतु आकाशच फाटले आहे, ठिगळ कोठे कोठे लावणार याची जाणिव संवेदनशील मनाच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांना झाली.
भाषणातून दु:ख व्यक्त करणारे व सोशल मिडियावर सल्ला देणारे राजकारणी पावलापावलावर भेटतील, पण खिशात हात घालण्याचे धाडस कोणी दाखवत नाही. महाराष्ट्रातील ग्रामीण भागाची ओल्या दुष्काळामुळे वाताहत झाली आहे. दररोज वर्तमानपत्रात बातम्या येवून आमदार मंदाताई म्हात्रे यांचे मन हेलावले आणि राज्यातील बळीराजाला मदत करण्यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. सर्वप्रथम आमदार मंदाताई म्हात्रेंनी स्वत:ची एक लाख रूपयाची मदत जाहीर केली. ओल्या दुष्काळ संकटावर मात करण्यासाठी व बळिराजाला उभे करण्यासाठी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईकरांना आवाहन केले. सोशल मिडियाचाही आधार घेतला. त्याला प्रतिसादही चांगला भेटू लागला आहे. लोक पैसा जमा करू लागले आहेत. लवकरच आमदार मंदाताई म्हात्रेंच्या माध्यमातून फुल न फुलाची पाकळी म्हणून जमा झालेला निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली जाणार आहे.
आमदार मंदाताई म्हात्रे या नवी मुंबईतील आगरी समाजाच्या आमदार. परंतु यापूर्वीच्या पक्षात असताना त्यांनी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्षपद भूषविताना महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. त्यांना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची, जनजीवनाची व समस्यांची जाणिव आहे. त्यामुळे ओल्या दुष्काळाच्या संकटातून बळीराजाला बाहेर काढण्यासाठी भाजपा आमदार मंदाताई म्हात्रेंनी घेतलेला पुढाकार आज नवी मुंबईकरांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मार्केटच्या आवारातील व्यापारी, माजी संचालक आणि अन्य घटकांच्या माध्यमातून चांगला निधी उभा राहण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील बळीराजाला सावरण्यासाठी आगरी समाजाच्या रणरागिनीने घेतलेला पुढाकार आज नवी मुंबईतील पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व अन्य भागातील लोकांच्या भावनेला हात घालून गेला आहे.