आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचा भावनिक सत्कार करताना ‘जीवाभावाचे मित्र’ परिवार सदस्य
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : बेलापुर विधानसभा मतदारसंघातल्या भाजपच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या महाराष्ट्रातील ग्रामीण भागात संततधार पावसामुळे झालेल्या हानीची सातत्याने स्वत:कडे ‘अपडेट’ घेत आहेत. वर्तमानपत्रातील बातम्या व वृत्तवाहिन्यातील बातम्या पाहून आमदार मंदाताई म्हात्रे यांचे मन हेलावले आणि त्यांच्यातील मातृत्वाला पाझर फुटला. सोशल मिडियावर कार्यरत राहून मतदारांशी सुसंवाद साधणाऱ्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी ‘जिवाभावाचे मित्र’ या व्हॉट्स ग्रुपमधील सदस्यांशी विचारविनिमय करून संकल्पना मांडून ओल्या दुष्काळामुळे हानी झालेल्या बळीराजाच्या मुलांनाच थेट मदतीचा निर्णय घेतला आहे. लवकरच ग्रामीण भागात जावून बळीराजांच्या मुलांना आमदार मंदाताई म्हात्रे व सोशल मिडियावरील त्यांचे सहकारी मदत करणार आहे.
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या स्पष्टवक्त्या म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रसिध्द आहेत. त्यांच्या राजकीय कार्यापाठोपाठ सामाजिक कार्याचा डोंगरही त्यांनी उभा केलेला आहे. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा म्हणून आमदार सौ. मंदाताई म्हात्रेंनी सक्षमरित्या कार्यभार सांभाळल्याने ग्रामीण भागाची व ग्रामीण जनतेची त्यांना चांगलीच नस माहिती आहे. ओल्या दुष्काळाबाबत आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी कृषीक्षेत्राशी असलेली व बळीराजाशी असलेली आपुलकी म्हणून सातत्याने माहिती जाणून घेत आहे.
आपल्या व्हॉट्स ग्रुपमधील तसेच परिचितांकडून मदतनिधी गोळा करून लवकरात लवकर आमदार सौ. मंदाताई म्हात्रे ग्रामीण भागातील वस्तीगृहामध्ये जावून विद्यार्थ्यांना मदतनिधी देणार आहे. मला बळीराजाच्या मुलांना माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून खारीचा वाटा म्हणून मदत करायची आहे. माझी त्याची बातमीही मला नको, फोटोही नको असे सांगत आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी आपल्या ‘हातभार बळीराजाच्या मुलांच्या संकट निवारणासाठी’ या अभियानास सुरूवातही केली आहे. त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम स्वत: एक लाख रूपयांचा मदतनिधी दिला आहे. त्यांच्या व्हॉटसग्रुपमधील सदस्यांनी प्रत्येकी एक हजार रूपये काढण्यास सुरूवात केली आहे.
गुरूवारी ओल्या दुष्काळाबाबत आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी आपल्या सोशल मिडियावरील सदस्यांशी चर्चा करत समस्येचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्याचवेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत हे एका कार्यक्रमाचे निमत्रंण देण्यासाठी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्याकडे आले असता, मंदाताई म्हात्रे यांनी या कार्यक्रमाबाबत त्यांना सांगून बळीराजाच्या मुलांना मदत करण्याचे त्यांना आवाहन केले. त्यांनीही तात्काळ ५० हजार रूपये देण्याचे जाहिर केले. भाजप पदाधिकारी डॉ. राजेश पाटील यांनीही आपली मदत देण्याचे मान्य केले.
नेरूळमधील सदस्यांनी मनोज मेहेर यांच्याकडे निधी जमा करण्यास सुरूवात केली आहे. बांधकाम व्यावसायिक दिनेश डेरे, नगरसेवक सुरज पाटील, नगरसेविका सौ. सुजाता पाटील यांनी प्रत्येकी ५ हजार रूपये तर युवा सेनेचे निखिल मांडवे यांनी २ हजार रूपये जमा केले. इतर सदस्यांनीही निधी देण्यास सुरूवात केली आहे.
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या निवासस्थानी ओल्या दुष्काळाबाबत झालेल्या चर्चेच्या बैठकीच्या वेळी त्यांच्या सोशल मिडियावरील ‘जीवाभावाचे मित्र’ या एका व्हॉटसअप ग्रुपवरील सदस्य विजय घाटे, सौ. सुहासिनी नायडू, माजी नगरसेवक सतीशदादा रामाणे, मनोज मेहेर, रवींद्र भगत, दिनेश डेरे, दिनेश चौधरी, ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील उपस्थित होते. यावेळी उपस्थित असलेले डॉ. राजेश पाटीलही चर्चेत सहभागी झाले होते. आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या लवकरच आपल्या बिगर राजकीय या सामाजिक पथकासमवेत बळीराजाच्या मुलांना मदत घेवून जाणार आहेत.
यावेळी सौ. मंदाताई म्हात्रे बेलापुर विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबाबत त्यांचा ‘जिवाभावाचे मित्र’ सदस्यांकडून छोटेखानी भावनिक सत्कारही करण्यात आला.