सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ / navimumbailive.com@gmail.com
- मराठी तरुणांसाठी मनसे आक्रमक
- १२ दिवसांत मराठी तरुण – तरुणींचा ६ महिन्यांचा ८ ते १० लाख रुपये थकीत पगार देण्याचे हॉस्पिटल प्रशासनाने दिले लेखी आश्वासन
नवी मुंबई – मराठी तरुणांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज चांगलीच आक्रमक झालेली पुन्हा एकदा दिसून आली. नेरुळ सेक्टर १६ येथील सन शाईन हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एकूण १७ मराठी तरुण – तरुणांचा गेल्या सहा महिन्यांचा ८ ते १० लाख रुपये पगार हॉस्पिटल प्रशासनाने थकविला. याबाबत हॉस्पिटल प्रशासनाकडे या मराठी तरुण – तरुणींनी विचारले असता, त्यांना हॉस्पिटल प्रशासनाकडून उडवा – उडवीची उत्तरे दिली जात होती. याबाबत मनसेचे सानपाडा – पामबीच विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांच्याकडे या मराठी तरुण – तरुणींनी लेखी तक्रार केली. मराठी तरुण – तरुणींवर होत असलेल्या अन्यायाची मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी दखल घेतली. तात्काळ विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी आपले सहकारी मनसेचे नेरुळमधील उपविभाग अध्यक्ष विनोद पाखरे, मनसेचे सानपाडा उपविभाग अध्यक्ष देवेंद्र पिल्ले, महाराष्ट्र सैनिक शशिकांत गायकवाड, महाराष्ट्र सैनिक नितीन पाटील यांच्यासोबत हॉस्पिटलवर धडक दिली. हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर बाळकृष्ण जोशी तसेच डॉक्टर आर.एस.इनामदार यांना मनसेच्या शिष्टमंडळाने जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. हॉस्पिटल प्रशासनाच्या विरोधात आक्रमक झालेल्या मनसेच्या शिष्टमंडळापुढे नरमाईची भूमिका घेत हॉस्पिटल प्रशासनाने येत्या १२ दिवसांत या मराठी तरुण – तरुणींचा संपूर्ण थकीत पगार देण्याचे लेखी आश्वासन मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांना दिले. हॉस्पिटल प्रशासनाने येत्या २० नोव्हेंबरपर्यंत आपला शब्द पाळला नाही तर सन शाईन हॉस्पिटलच्या विरोधात मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हॉस्पिटल प्रशासनाला मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी दिला.