श्रीकांत पिंगळे :Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई – सानपाडा रेल्वे स्टेशन प्रबंधकाच्या कार्यालयातून होणारी पाण्याची चोरी थांबवण्यासाठी मनसेने आज आक्रमक भूमिका घेतली. याबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने रेल्वे स्टेशन प्रबंधक सत्यप्रकाश यांची भेट घेऊन लेखी पत्र दिले.
सानपाडा रेल्वे स्थानकातील स्टेशन प्रबंधकाच्या कार्यालयातून पाण्याची चोरी होत असल्याची धक्कादायक बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निदर्शनास आलेली असून हे पाणी लगतच्या व्यावसायिकांना पुरवले जात आहे. त्याकरिता हे कार्यालय रात्री उशिरापर्यंत खुले ठेवले जात असल्याने त्यामागे अर्थकारण असल्याचा आरोप मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी केला. या कार्यालयात बाहेरील व्यक्तींना प्रवेश नाकारणे आवश्यक असतानाही रात्री उशिरापर्यंत हे कार्यालय केवळ लगतच्या व्यावसायिकांसाठी खुले ठेवले जात आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत तिथल्या स्टेशन प्रबंधकाच्या कार्यालयात खाजगी व्यक्तींची ये-जा सुरू असते. यामध्ये एखादे गुन्हेगारी कृत्यही त्या ठिकाणी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सानपाडा रेल्वे स्थानकातील जबाबदार अधिकाऱ्यांकडून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून भ्रष्ट अधिकारी तसेच लगतच्या व्यावसायिकांचे मात्र चांगलेच फावले आहे. स्टेशन प्रबंधकांनी हा प्रकार तात्काळ थांबवावा, अन्यथा रेल्वे प्रबंधकाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी दिला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश मढवी, मनसेचे उपविभाग अध्यक्ष देवेंद्र पिल्ले, शाखा अध्यक्ष अमन गोळे, महाराष्ट्र सैनिक सुनंदा दळवी, सायली पवार, श्रीकांत आतकरी, विवेक कदम उपस्थित होते.