सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ठाणे – बेलापूर मार्गावरील वाहनांची सततची वाहतूक व त्यामुळे रस्ता ओलांडताना यापूर्वी झालेले अपघात व त्यात झालेली जिवीत हानी पाहता याबाबत महापालिका सभागृहात आवाज उठवतानाच या मार्गावर आयकीआय कंपनी प्रवेशद्वार ते अरिहंत आयटीपार्क प्रवेशद्वारापर्यंत स्कायवॉक बांधण्यात यावा अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे केली व त्यासाठी निविदा मंजूर करण्यात आली. मात्र या कामाकरीता कमी दराची तरतूद करण्यात आल्याने निविदा प्रक्रियेस कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान गेल्या महिन्यात याच मार्गावर एका महिलेस अपघात होत तिचा मृत्यु झाला. याबाबत महापालिका प्रशासनाने १५ दिवसात योग्यतो मार्ग काढण्याचे आश्वासन दिले असून त्याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे हा प्रश्न त्वरीत मार्गी लावावा, या मागणीसाठी दि. २२ नोव्हेंबर रोजी ठाणे-बेलापूर महामार्गावरील तुर्भे स्टोअर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्थानिक नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी महापालिका प्रशासनास दिला आहे.
नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना याबाबत दिलेल्या निवेदनात नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, तुर्भे स्टोअर, इंदिरानगर येथील हजारोंच्या संख्येने रहिवासी तसेच एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील कामगार वर्ग तुर्भे स्टोअरपासून तुर्भे रेल्वे स्टेशन तसेच वाशीला जाण्यासाठी रस्ता ओलांडतांना शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरुन रस्दता ओलांडावा लागतो. अशा परिस्थितीत अपघाताची शक्यता असतेच; गेल्या दि. १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या एका अपघातात रस्ता ओलांडणाऱ्या महिलेस टँकरची धडक बसल्याने तिचा जागीच मृत्यु झाला. त्यामुळे संतप्त नागरीकांनी हा महामार्ग वाहतुकीसाठी रोखला होता. यावेळी नागरीकांचा संताप मोठा होता, परंतु आपण लोकप्रतिनिधी या नात्याने जनतेला शांत केले व अनर्थ टळला. तथापी सदर घटनेची माहिती प्रशासनास देऊनही कोणी जबाबदार अधिकारी घटनास्थळी हजर झाला नाही व महापालिका आयुक्तांशी स्वत: चर्चा करीत हा प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन त्यावेळी त्यांनी दिल्याने नागरीकांनी आंदोलन मागे घेतले. मात्र अजूनही याठिकाणच्या प्रस्तावित स्कायवॉक बाबत कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात यासाठी येत्या दि. २२ रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी महापालिका प्रशासनास दिला आहे.
वाहतुकीत अत्यंत व्यस्त असलेल्या ठाणे-बेलापूर मार्गावरील तुर्भे स्टोअर परिसरातील नागरीकांना व अन्य पादचाऱ्यांना रस्ता ओलांडल्याशिवाय अन्य ठिकाणी जाता येत नाही. त्यामुळे या मार्गावर अनेकदा अपघात घडत काहींचा जीव गेला आहे तर काहींना जखमी अवस्थेत उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागले आहे. त्यापैकी काहींना अपंगत्वही आले आहे. त्यामुळे या रस्त्यावर स्कायवॉकची असलेली आवश्यकता लक्षात घेत स्थानिक नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी महापालिका सभागृहात याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधत विषयाचे गांभीर्य स्पष्ट केले व या प्रश्नी निवेदनांद्वारे पाठपुरावाही केला. त्यानुसार साधारणत: ४ वर्षांपूर्वी स्कायवॉक मंजूर होऊन निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मात्र या कामाकरीता कमी दराची तरतूद करण्यात आल्याने सदर निविदा प्रक्रियेस ठेकेदाराकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी स्कायवॉकचा मुद्दा स्थगित राहीला. दरम्यानच्या काळात सदर प्रकरणाची वस्तुस्थिती आपण महापालिका प्रशासनाच्या लक्षात आणून देतांनाच प्रभागातील अन्य नगरसेकांनीही सभागृहाचे कामकाज याप्रश्नी बंद पाडत प्रशासनाचे लक्ष वेधले. अखेरीस या साऱ्याची दखल महापालिकेककडून अडीच ते ३ मीटर उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला. मात्र या प्रस्तावाला स्थानिकांचा विरोध असून ज्याप्रमाणे सविता केमिकल कंपनी येथे साडेपाच ते ६ फूट उंचीचा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे, त्याप्रमाणे तुर्भे परिसरात उड्डाणपूल व्हावा, असे झाल्यास भविष्यकाळातील एसआरए योजना विकसित करण्यासाठी मोठ्या वाहनांनाही अडसर न ठरता ती सुलभपणे मार्गस्थ होतील, अशी स्पष्टताही नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.