नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका वर्षानुवर्षे काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनात गेल्या अनेक वर्षांपासून कामगार ठोक मानधनावर काम करत आहेत. वर्षानुवर्षे महापालिका प्रशासनात काम करूनही त्यांची सेवा आजतागायत कायम झालेली नाही. नागरी सुविधा पुरविण्याचे व नागरी समस्या सोडविण्याचे काम करूनही त्यांची सेवा आजतागायत कायम झालेली नाही. नागरी सुविधा पुरविण्याचे व नागरी समस्या सोडविण्याचे काम हे ठोक मानधनावरील कामगार इमानेइतबारे करत आहेत. महापालिका प्रशासनाला राज्य व केंद्र सरकारकडून सातत्याने पुरस्कार प्राप्त होत आहेत. त्यामध्ये या ठोक मानधनावरील काम करणाऱ्या कामगारांचे योगदान फार मोठे आहे. वर्षानुवर्षे महापालिका प्रशासनात काम केल्यामुळे त्यांचे वय वाढले आहे. परिणामी अन्यत्र कोठेही त्यांना रोजगार भेटू शकत नाही. महापालिका प्रशासनाकडून संबंधित कामगारांना कोणत्याही प्रकारची आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाही अथवा तातडीने कोणतीही वैद्यकीय मदतही त्यांना मिळत नाही, ही खरी शोकांतिका असल्याचे नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने ठोक मानधनावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना, नियमानुसार प्रत्येक कर्मचाऱ्यांची मुलाखत घेतलेली आहे व मुलाखतीत या कामगारांची निवड केलेली आहे. हे कर्मचारी मागच्या दरवाजाने नियुक्त केलेले आहेत, हा नवी मुंबई महानगरपालिकेकडून केलेला युक्तीवाद चुकीचा आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ घेवून मागील दाराने नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यास नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत कायम करता येणार नाही, ही सबब चुकीची आहे. म्हणून ठोक मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची सेवा मुंबई महानगरपालिकेने सन १९९७-९८ मध्ये ज्या धर्तीवर ठोक मानधनावर काम करणाऱ्या तात्पुरत्या कर्मचाऱ्याची सेवा नवी मुंबई महापालिकेच्या आस्थापनेवर कायम करून न्याय द्यावा व प्रस्तावित केल्यानुसार सदरच्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना ठेकेदाराच्या आस्थापनेवर काम करण्यास भाग पाडू नये अन्यथा इंटकला याबाबत दीर्घकालीन लढाई उभारावी लागेल असा इशारा नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी निवेदनातून दिला आहे.
ठोक मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्याऐवजी या सर्व कामगारांना पालिका प्रशासन एकच ठेकेदार नेमून ती सेवा त्या ठेकेदाराच्या माध्यमातून उपलब्ध करून घेणार आहे. ठेकेदाराचे पोट भरण्यासाठी आता नव्याने ठोक मानधनावरील कामगारांची ससेहोलपट करून घेण्याचे हे षडयंत्र असल्याचा संताप संबंधित कामगारांकडून व्यक्त केला जात आहे. या कामगारांनी आजमितीला गृहकर्ज घेतले आहे. मुलांच्या शिक्षणावर खर्च सुरू आहे. कोणी घराचे भाडे भरत आहेत. महागाईच्या काळात तुटपुंज्या वेतनात आपली व आपल्या परिवाराची उपजिविका हे ठोक मानधनावरील कामगार चालवित आहेत.या कामगारांचे ठोक मानधनावरील सेवेचे कायम सेवेत रूपांतर झाल्यास त्यांना महापालिका प्रशासनाकडून अन्य कामगारांप्रमाणे वेतन व अन्य सोयीसुविधाही उपलब्ध होतील, ठोक मानधनावर काम करणारे कामगार आज अंत्यत हलाखीच्या परिस्थितीत काम करत आहेत. पालिका प्रशासनाची वर्षानुवर्षे इमानेइतबारे सेवा करणाऱ्या ठोक मानधनावरील कामगारांचा आता गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. समस्येचे गांभीर्य पाहता, नवी मुंबई महापालिका प्रशासनाला ठोक मानधनावर काम करणाऱ्या कामगारांची सेवा कायम करण्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी निर्देश द्यावेत अशी मागणी निवेदनात शेवटी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी केली आहे.