स्वयंम न्यूज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : राज्यात कोणतेही सरकार सत्तेवर आले की सर्वप्रथम त्याचा फटका राजकीय संघटनांशी, नेतेमंडळींशी अथवा राजकीय पक्षांशी सलगी असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना बसतो. सर्वप्रथम बदलीची कुऱ्हाड प्रशासकीय अधिकाऱ्यांवर बसते आणि त्यांना नवीन कार्यक्षेत्रात निघून जावे लागते. राज्यात नुकत्याच झालेल्या सत्तापालटाचा फटका नवी मुंबईतील महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना बसणार असून येत्या काही दिवसातच त्यांची बदली होणार असल्याची माहिती मंत्रालयीन सूत्रांकडून देण्यात आली आहे.
राज्यात झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये भाजपला १०५ जागा मिळूनही मुख्यमंत्रीपदावरून झालेल्या वादामुळे सत्ता स्थापन करण्यात अपयश आले. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद अडीच वर्षे देण्यास भाजप तयार नसल्याने राज्यात शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी महाविकासआघाडी अस्तित्वात आली. महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यावर सर्वप्रथम भाजपधार्जिणे, भाजपवर प्रेम असणाऱ्या, भाजपच्या नेत्यांशी सलगी असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा शोध घेणे महाविकास आघाडीतील राजकीय ‘तज्ज्ञ’ मंडळींनी सुरू केले आहे. त्याच पहिल्याच चाचपणीत नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांचा शोध लागला असल्याची माहिती मंत्रालयीन सूत्रांनी दिली.
अण्णासाहेब मिसाळांचा गोपीनाथ मुंडेपासून भाजपशी सलगी असल्याचे व शिवसेना-भाजपच्या सत्ताकाळातही मिसाळ हे मुंडेंचेच अधिकारी असल्याचे सांगण्यात येत आहे. मिसाळ यांचे नवी मुंबई आयुक्तपदावर झालेली बदली ही सहजासहजी झालेली नसून त्यासाठी चांगल्या आचाऱ्यांना व खवय्यांना मोठी मिठाई वाटण्यात आली असल्याची खमंग चर्चाही मंत्रालयीन आवारात सुरू आहे.
आयुक्त मिसाळ हे केवळ भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे व कॉंग्रेसचे प्रदेश पदाधिकारी रमाकांत म्हात्रेंशीच अधिक सलगी ठेवून असल्याचा आरोपही महापालिका मुख्यालयात नगरसेवकांकडून खासगीत चर्चेत केला जात आहे. आयुक्त मिसाळ यांच्या बदलीबाबत महाआघाडीकडून निश्चित झाले असून येत्या काही दिवसातच मिसाळ यांच्या बदलीचे आदेश निघणार असल्याचे मंत्रालयीन सूत्रांकडून सांगण्यात आले.
एप्रिल २०२० मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची सहावी सार्वत्रिक निवडणूक होत असुन भाजपचे ऐरोलीमधील आमदार गणेश नाईकांच्या महापालिकेवरील वर्चस्वाला खिंडार पाडण्यासाठी महाविकासआघाडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गणेश नाईकांना अडचणीत आणण्यासाठी नवी मुंबईतील भाजपची काही मंडळी महाविकास आघाडीतील लोकांशी संपर्क साधून वार्डाचे समीकरण सांगण्यातही व्यस्त झाली आहेत. सध्या नवी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसची धुरा माथाडी नेते शशिकांत शिंदे तर शिवसेनेची धुरा उपनेते विजय नाहटा सांभाळत आहे. कॉंग्रेसकडून संतोष शेट्टी, रमाकांत म्हात्रे, अनिल कौशिक, अविनाश लाड या चौकडीवर धुरा असली तरी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनीही प्रदेश पातळीवर व मंत्रालयीन पातळीवर आपली छाप पाडण्यात व जम बसविण्यात यश मिळविले आहे. महाविकास आघाडीच्या समीकरणात रवींद्र सावंतांचे पुर्नवसन हाही मोठा अडथळा ठरणार आहे. गणेश नाईकांना अडचणीत आणण्यासाठी व भाजपला महापालिका सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठी महाआघाडीचा प्रयोग यशस्वी करायचा झाल्यास शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसला जुईनगरमधील कोणत्या तरी एका प्रभागावर रवींद्र सावंतांसाठी पाणी सोडावे लागणार आहे.
गणेश नाईकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडल्यापासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पालिका सभागृहात, संघटनात्मक पातळीवर खिळखिळी झाल्याचे पहावयास मिळत आहे. परंतु विधानसभा निवडणूकीत ऐरोली व बेलापुर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळालेले मतदान पाहता नवी मुंबईत शरद पवारांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर असल्याचे मतपेटीतूनच स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे ४० नगरसेवक असून शिवसेनेचीही संघटनात्मक बांधणी व जनाधारात शिवसेनाही उजवी आहे. भाजपविरोधी मतांमध्ये फाटाफूट होवू नये म्हणून शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसला महाविकास आघाडीत कॉंग्रेसलाही सामील करून घ्यावे लागणार आहे.
अवघ्या पाच महिन्यावर नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका आल्या असल्याने भाजपशी जवळीक असा शिक्का असणाऱ्या अण्णासाहेब मिसाळांना महापालिक आयुक्तपदी ठेवणे महाविकासआघाडीला राजकीयदृष्ट्या परवडणारे नसल्याचे मंत्रालयात बोलले जात आहे. त्यामुळे अण्णासाहेब मिसाळ यांचे नवी मुंबईतील आयुक्तपदावरील सहवास हा काही दिवसाचाच राहीला असून लवकरच नवी मुंबईच्या महापालिका आयुक्तपदी महाविकास आघाडी त्यांना अनुकूल असा प्रशासकीय अधिकारी आयुक्तपदी नियुक्त करणार असल्याची माहिती मंत्रालयीन सूत्रांनी दिली.